अबू आझमींच्या भाच्याला अटक

By admin | Published: June 8, 2017 06:58 AM2017-06-08T06:58:36+5:302017-06-08T06:59:04+5:30

दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली

Abu Azmi's brother arrested | अबू आझमींच्या भाच्याला अटक

अबू आझमींच्या भाच्याला अटक

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्ली पोलिसांच्या ‘स्पेशल सेल’ने मंगळवारी अबू असलम कासिम नामक तरुणाला वाकोल्यातील पंचतारांकित हॉटेलमधील एका रूममधून अटक केली. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.
वाकोल्याच्या ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये कासिम लपल्याची माहिती दिल्लीच्या स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त संजीव यादव यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने या हॉटेलमधून कासिमला अटक केली. या ठिकाणी तो त्याच्या मैत्रिणीसोबत आला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे वाकोला पोलिसांकडून सांगण्यात आले. कासिम हा मुंबई समाजवादी पक्षाचे नेते अबू असिम आझमी यांचा भाचा असून, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये त्याचा सहभाग असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एका ठिकाणी धाड टाकत अमलीपदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला. ज्याची किंमत सुमारे चाळीस कोटी रुपये आहे. या प्रकरणी तिघांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची चौकशी सुरू केली. हे अमलीपदार्थ कासिमनेच त्यांना पुरविले असून, अमलीपदार्थांचा तो देशातील मोठा तस्कर असल्याचेही ते म्हणाले. तेव्हापासून दिल्ली पोलिसांची कासिमवर नजर होती. समुद्रमार्गे अमलीपदार्थांची तस्करी तो करत होता. दुबईमध्ये असलेल्या कैलाश राजपूत नामक इसमाचेही नाव या प्रकरणी पुढे आले आहे. राजपूत दुबईतून अमलीपदार्थ कासिमला पुरवत होता. कासिमनंतर मुंबई, दिल्ली तसेच अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
>कार्गो कंपनीत
झाली ओळख
बारावीतून शाळा सोडलेला कासिम दुबईत दनाट कार्गो कंपनीत २००८ सालापर्यंत काम करत होता. नंतर त्याने गोव्यात ओशियन विंग या कंपनीत २०१० ते २०१३पर्यंत काम केले. त्यानंतर हनिफ नावाच्या एका मित्रामुळे कासिमची ओळख कैलाश राजपुतशी झाली. तो दुबईतील कुख्यात ड्रग सप्लायर आहे. रातोरात श्रीमंत होण्याच्या स्वप्नातून कासिमने राजपुतशी हातमिळवणी केली आणि तो या व्यवसायात आला, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
अमेरिकेतही पुरवठा
कासिम हा जगभरात अमलीपदार्थांची तस्करी करत होता. तसेच अमेरिकेतही कुरिअरमार्फत तो ड्रग्ज सप्लाय करत असल्याचीही माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली.
त्या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे. ज्यात अजून काही लोकांना अटक होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Abu Azmi's brother arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.