अबू सालेमची युरोपियन कोर्टात धाव
By admin | Published: June 18, 2017 01:36 PM2017-06-18T13:36:11+5:302017-06-18T13:36:11+5:30
1993 साली मुंबईत बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेम याने आता शिक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कायदेशीर
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेम याने आता शिक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कायदेशीर डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. सालेमने युरोपियन कोर्टात धाव घेतली आहे. आपल्याला पोर्तुगालला परत नेण्याची मागणी त्याने केली आहे. पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आल्यानंतर अबू सालेमचं अटी शर्तींसह भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यावेळी सालेमला फाशी आणि दीर्घ कारावासाची शिक्षा होणार नाही, अशी अट पोर्तुगाली न्यायालयाने घातली होती. दरम्यान सालेमला दोषी ठरवल्यानंतर टाडा न्यायालय उद्या त्याला शिक्षा सुनावणार आहे.
सालेमने युरोपियवन कोर्टात केलेल्या याचिकेत भारतात आपल्यावर बेकायदेशीर रीत्या कारवाई करण्यात येत असून, तसेच त्याने कारागृहातील जागेबाबतही तक्रार नोंदवली आहे. आपल्याला अशा कोठडीत ठेवण्यात आले आहे. जिथे सूर्यप्रकाशसुद्धा येत नाही असे त्याने म्हटले आहे. देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले होते. मात्र त्यांना देशाविरुद्ध युद्ध छेडल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यास न्यायालयाने नकार दिला. या सर्वांनी बाबरी मशीद पाडल्याचा सूड घेण्यासाठी, तसेच काही नेत्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बॉम्बस्फोटाचा कट रचला व अंमलात आणल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले.