मुंब्रामधील तरुणीशी लग्न करण्यासाठी अबू सालेमचा पुन्हा एकदा अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:49 PM2017-07-18T12:49:26+5:302017-07-18T12:49:26+5:30
रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन मुंब्रामधील तरुणीशी धार्मिक पद्धतीने लग्न करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अबू सालेमने अर्ज केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - 1993 मुंबई स्फोटात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता अबू सालेमला लग्नाच्या बोहल्यावर चढण्याची उत्सुकता लागलेली दिसत आहे. रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन मुंब्रामधील तरुणीशी धार्मिक पद्धतीने लग्न करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अबू सालेमने अर्ज केला आहे. 2005 रोजी अबू सालेमचं पोर्तुगालमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आलं होतं. त्याच्यावर डझनहून जास्त केसेस आहेत, ज्यामध्ये बॉम्बस्फोट आणि एका हत्येचा समावेश आहे ज्यासाठी 2015 रोजी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या
अबू सालेमने लग्नासाठी परवानगी मिळावी यासाठी अर्ज करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी 2015 मध्येही त्याने अर्ज केला होता. यानंतर तरुणीनेही टाडा न्यायालयात अर्ज करत अबू सालेमसोबत लग्न करण्याची परवानगी मागणारा अर्ज दाखल केला होता.
2014 रोजी मीडियामध्ये माझं नाव आणि फोटो आल्याने बदनामी झाली असून, अबू सालेमसोबत लग्न होणार असल्याच्या अफवांमुळे आपल्याला कोणतंच स्थळ येत नाही आहे असा दावा तरुणीने अर्जात केला होता. त्यावेळी न्यायालयाने लग्नासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसल्याचं सांगितलं होतं. यानंतर दोन महिन्यांनी अबू सालेमने महिलेसोबत लग्न करण्यासाठी कारागृहातून सोडण्याची परवानगी मागितली होती. कोणताही कायदा मला लग्न करण्यापासून रोखू शकत नाही असं त्याने अर्जात म्हटलं होतं. आपल्याला रजिस्ट्रार कार्यालयात जाण्यासाठी परवानगी मिळाल्यास गैरवापर करणार नाही असं आश्वासनही त्याने दिलं होतं. त्याचा विनंती अर्ज अद्यापही प्रलंबित आहे.
सोमवारी अबू सालेमने नव्याने अर्ज केला असून मुंबई आणि दिल्लीमधील दोन केसच्या आधारे न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे. या प्रकरणांमध्ये कैद्यांना लग्नासाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाने हे जामीन मंजूर केले होते.
कोण आहे ही तरुणी
ही तीच तरुणी आहे जिच्या सोबत धावत्या मेल गाडीत अबूने विवाह केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले होते. त्याची दखल घेत न्यायालयाने याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र या घटनेमुळे खूप बदनामी झाली आहे. कुटुंबात व वास्तव्य करत असलेल्या विभागात जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे अबूसोबत विवाहास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज त्या मुलीने विशेष टाडा न्यायालयात केला होता. त्याचे प्रत्युत्तर सादर करताना अबूनेही या विवाहास होकार दिला होता. त्या मुलीची माझ्यामुळे खूप बदनामी झाली आहे. तिला समाजात सन्मानाने जगता यावे यासाठी मी तिच्याशी विवाह करणार आहे, असे अबूने न्यायालयाला कळवले होते.