तुरूंगात अबू सालेमची बडदास्त... पार्टीसाठी चिकन, २४ तास मोबाइल
By admin | Published: December 3, 2015 03:42 AM2015-12-03T03:42:16+5:302015-12-03T09:13:06+5:30
पार्टीसाठी केएफसीमधून चिकन मागवण्याची सवलत, २४ तास मोबाइल आणि अंघोळीसाठी गरम पाणी असा तुरुंगातील एकेक राजेशाही थाट ऐकला की, थक्क व्हायला होईल.
पनवेल : पार्टीसाठी केएफसीमधून चिकन मागवण्याची सवलत, २४ तास मोबाइल आणि अंघोळीसाठी गरम पाणी असा तुरुंगातील एकेक राजेशाही थाट ऐकला की, थक्क व्हायला होईल. तुरुंगातील गैरप्रकाराच्या बातम्या वारंवार येत असताना, आता थेट तळोजा कारागृहातील अबू सालेमच्या बडदास्तीची माहिती समोर येत आहे. या वेळेस ही धक्कादायक माहिती जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांनी चौकशी समितीला दिलेल्या लिखित जबाबातच दिली आहे.
अबूने या वर्षीच जेल अधीक्षक हिरालाल जाधव यांच्यावर आरोप केले होते की, हिरालाल यांनी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले होते. त्यानंतर अबू सालेमच्या या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीसमोर जबाब देताना तुरुंग अधीक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितले की, ‘सालेम जेलमध्ये राजेशाही थाटात राहत आहे. अबू जेलमध्ये अशा सुविधा उपभोगत आहे, ज्याची इतर कैदी कल्पनाही करू शकत नाहीत. सालेमला घरचे जेवण खाण्याची परवानगी आहे.’
त्यामुळे तो दोन ते तीन व्यक्तींसाठी बाहेरून जेवण मागवतो. सालेम नेहमी मोक्काअंतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी विश्वनाथ शेट्टीसोबत जेवण करतो. या शिवाय आणखी दोन जण त्याच्यासोबत जेवण करण्यासाठी असतात. पूर्वी निरज ग्रोवर हत्याकांडातील आरोपी जयराम हा अबूबरोबर जेवण करीत असे. त्याला शिक्षा झाल्याने, तो आता कोल्हापूरातील कारागृह सजा भोगत आहे. त्यामुळे सालेमचे मित्र बदलले असून, अंडासेलबरोबर इतर बराकीतसुद्धा त्याने मैत्रीचे संबध प्रस्थापित केले आहेत.
अबू सालेमला किचनमधून अंघोळीकरिता गरम पाणीसुद्धा दिले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली. या शिवाय किचनमधून कांदा, लिंबू त्याला पुरवले जातेच, त्याचबरोबर त्याची मर्जी कर्मचारी व अधिकारी सांभाळतात. कारागृहात तो बिनधास्तपणे सगळीकडे फिरत असून, त्याला कोणाचाच लगाम नसल्याची माहिती सुटून आलेल्या कैद्याने दिली. अबू जेलमध्ये स्वत:चे नेटवर्क तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. जेलमध्ये पार्टी करण्यासाठी केएफसीमधून चिकनही मागवतानाही सालेमला पकडण्यात आले होते. सालेम २४ तास मोबाइल वापरतो, असाही आरोप जाधव यांनी केला आहे. त्यांच्या जबाबातील आरोपांत तथ्य असेल, तर प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, शेकडो निष्पापांच्या मृत्यूंना कारणीभूत असलेल्या व खंडणी, धमकी, हत्यांसारखे गंभीर गुन्हे नावावर असलेल्या गुन्हेगाराला अशा राजेशाही थाटात का ठेवले जाते आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
डॉनचे अनेक दुश्मन
डी गँगचा म्होरक्या मुस्तफा डोसा याने अबु सालेमवर आर्थर रोड जेलमध्ये वार केल्यानंतर, सालेमला 2010 साली तळोजा जेलमध्ये हलविण्यात आले. तेव्हापासून तो अंडासेलमध्ये असून, तेथून सालेमला न्यायालयात नेले जाते. त्याच्या अरेरावी वृत्तीमुळे तळोजा मध्यवर्ती कारागृहात विरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्याच भावनेतून जेडीने त्याच्यावर कारागृहात फायरिंग केली होती. त्यावरून सालेम विरोधात कैद्यांमध्ये किती असंतोष आहे, याचा प्रत्यय आला.
मुलाखतीसाठीही प्राधान्य
मुलाखतीसाठी (गुन्हेगार व नातेवाईकांची भेट) नियमानुसार ज्याचे नातेवाईक अगोदर आले, त्याला प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर फक्त २० मिनिटे मुलाखतीची मर्यादा आहे आणि आठवड्यातून एकच तास मुलाखत दिली जाते. मात्र, सालेमला केव्हाही मुलाखत दिली जाते, त्याची खिडकी आरक्षित करून ठेवली आहे.