निधीअभावी रखडली प्रयोगशील शिक्षणाची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:11 AM2020-02-14T06:11:54+5:302020-02-14T06:11:58+5:30

शिक्षकांमध्ये नाराजीचाच सूर; फेब्रुवारीचा पंधरवडा संपत आला तरी शालेय शिक्षण विभाग उदासीन

Abundance of fundraising practical education | निधीअभावी रखडली प्रयोगशील शिक्षणाची वारी

निधीअभावी रखडली प्रयोगशील शिक्षणाची वारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रयोगशील शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये राबवलेले कृतिशील उपक्रम शाळांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभागमागील काही वर्षांपासून राज्यात विविध ठिकाणी शिक्षणाची वारी हा उपक्रम राबवित आहे. यंदा नवीन सरकारकडून अद्याप या वारीच्या उपक्रमाला निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यातच आता परीक्षांचा कालावधी असल्याने हा उपक्रम राबविणे शक्य नाही. यामुळे यंदा शिक्षणाची वारी होणार नाही, असा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.
राज्यातील १०० टक्के विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक विविध शैक्षणिक साधनांचा वापर करतात. कल्पक शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांचा उपयोग इतर शाळांमधील शिक्षक-विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना कल्पकतेने शिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या कामालाही कौतुकाची पोचपावती मिळावी, हा शिक्षणाची वारी या उपक्रमामागील मूळ उद्देश आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मागील काही वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात राबविला जात आहे. या वर्षी मात्र नव्या सरकारने अद्याप यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. शिवाय जानेवारी उलटून फेब्रुवारीचा पंधरवडा संपत आला तरी यंदाच्या वारीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताबदलानंतर नवीन योजना, समित्या आणल्या जात आहेत, हे स्तुत्य असले तरी सोबतच काही चांगल्या योजनाही बंद करण्याचा घाट घातला असल्याचा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.

‘शिक्षणाची वारी’साठी देण्यात आलेला निधी
वर्ष खर्च (रुपये) वारीचे ठिकाण
२०१५-१६ २१,५९,६९२ पुणे
२०१६-१७ १,१५,६२,०४३ पुणे, नागपूर, औरंगाबाद
२०१७-१८ २,१२,०५,००० लातूर, अमरावती, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद
२०१८-१९ २,२२,८४,०१० मुंबई, जळगाव, कोल्हापूर, वर्धा

Web Title: Abundance of fundraising practical education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.