सोशल मीडियाचा दुरुपयोग गुन्हाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:13 AM2018-06-30T06:13:35+5:302018-06-30T06:13:38+5:30
सोशल मीडियाच्या आभासी विश्वात लिहिणारे, इतरांबद्दल अपमानस्पद पोस्ट लिहिण्यास मुक्त असल्याचे समजत असले
डॉ. खुशालचंद बाहेती
मुंबई : सोशल मीडियाच्या आभासी विश्वात लिहिणारे, इतरांबद्दल अपमानस्पद पोस्ट लिहिण्यास मुक्त असल्याचे समजत असले, तरी हा दुरुपयोग आहे, असे बजावून केरळ उच्च न्यायालयाने फेसबुकवर महिलेविषयी अश्लील मजकूर लिहिणाऱ्या एका राजकीय पक्षाच्या राज्य युवा महासचिवाचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.
या प्रकरणातील महिला ही एक सामाजिक कार्यकर्ती व एका खासदाराची पत्नी आहे. तिने नुकतेच एक पुस्तक प्रकाशित केले आहे. तिने दिलेल्या तक्रारीप्रमाणे फेसबुकवर आरोपीने तिच्याबद्दल अश्लील लिखाण केले आहे. त्याने फेसबुकवर या महिलेचा तिच्या पतीसह फोटोही टाकला असून, यावरुन लैंगिक छळाची पोस्ट तिच्या छळासाठीच टाकल्याचे स्पष्ट होते. या महिलेच्या तक्रारीवरून विनयभंग ३५४ अ (३) भा.दं.वि. व ६७ अ माहिती तंत्रज्ञान कायद्यासह केरळ पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने यापूर्वीच जामीन नाकारला आहे.
केरळ उच्च न्यायालयाने फेसबुकचा स्क्रीनशॉट पाहून आरोपीचे म्हणणे अमान्य केले. एका राजकीय पक्षाच्या राज्य महासचिवाने जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे, असे नमूद करून त्यांचे लिखाण प्रथमदर्शनी लैंगिक छळाचा गुन्हा आहे, असे मत व्यक्त केले. आरोपीला महिलेविषयी अपमानस्पद लिहिण्याचे कोणतेही कारण नव्हते. महिलेच्या लैंगिक छळासाठी आरोपीने अंगीकारलेली पद्धत ही सायबर सेक्सिझम किंवा सायबर दुर्व्यवहार प्रकारात मोडते व हा लैंगिक छळ आहे, असे नमूद करून जामीन अर्ज फेटाळला.