एसी लोकलला पावसाळ्यात मुहूर्त
By admin | Published: March 9, 2017 01:28 AM2017-03-09T01:28:07+5:302017-03-09T01:28:07+5:30
बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. ही लोकल धावण्यासाठी आता पावसाळ्याचा मुहूर्त लागणार आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्या
मुंबई : बहुचर्चित एसी लोकल (वातानुकूलित) सुरू होण्यास मुहूर्त मिळालेला नाही. ही लोकल धावण्यासाठी आता पावसाळ्याचा मुहूर्त लागणार आहे. मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या चाचण्या होणे बाकी असून, अद्यापही चाचण्यांना सुरुवात झालेली नाही. त्यानंतर, पश्चिम रेल्वेवरही चाचण्या होतील. मध्य व पश्चिम रेल्वेवर चाचण्या होण्यासाठी १६ आठवडे म्हणजेच साधारपणे चार महिने लागतील. त्यानंतर, एसी लोकल धावेल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
५४ कोटी रुपये किमतीची व बारा डब्यांची एसी लोकल साधारपणे दहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल दाखल झाल्यानंतर, लोकलमध्ये काही तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. या समस्या सोडवण्यास काही दिवस लागल्यानंतर, एसी लोकलच्या कारशेडमध्येच चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, लोकलच्या चाचण्या कारशेडबाहेरही घेण्यात येणार होत्या, परंतु आरडीएसओ (रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन) आणि भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड) कंपनीकडून काही तांत्रिक अडचणींमुळे कारशेडबाहेरही चाचण्या घेण्यात आलेल्या नाहीत. महत्त्वाची बाब म्हणजे, मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याचे निश्चित असतानाच, ही लोकल चालवण्यास मध्य रेल्वेने नकार दिला व पश्चिम रेल्वेने लोकल चालवावी अशी मागणी केली. त्यानुसार, पश्चिम रेल्वेने आपल्या मार्गावर लोकल विनाअडचण धावू शकते, असा सकारात्मक प्रतिसाद देत, रेल्वे बोर्डाकडे मंजुरी मागितली आहे, ती मंजुरीही अद्याप मिळालेली नाही.
दरम्यान, या अडचणी असतानाच मध्य रेल्वेवर कारशेडबाहेर एसी लोकलच्या चाचण्या घेण्यास तब्बल १२ आठवडे लागणार असल्याचे समोर आले आहे. साधारपणे १२ ते १४ चाचण्या या दरम्यान घेण्यात येतील. त्यानंतर, या लोकलच्या पश्चिम रेल्वेवरही चाचण्या घेण्यात येणार असून, जवळपास चार आठवडे चाचण्या होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, एसी लोकल धावेल. हे पाहता एसी लोकल धावण्यास पावसाळ्याचा मुहूर्त येईल. रेल्वे बोर्डाकडून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल चालवण्यास परवानगी मिळाली आणि त्यानंतर निर्णयात थोडा बदल होऊन मध्य रेल्वेवरील चाचण्या कमीदेखील होऊ शकतात, परंतु नियमानुसार तशा चाचण्या कमी होणे शक्यही नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ती धावणार कधी? हे गुलदस्त्यातच आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे बोर्डाकडून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल चालवण्यासाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. लवकरच परवानगी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- मुकुल जैन, पश्चिम रेल्वे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक