‘जेडीआयईटी’ला अकॅडमिक अॅडव्हायजरी बोर्डाची भेट
By admin | Published: January 14, 2017 11:45 PM2017-01-14T23:45:55+5:302017-01-14T23:45:55+5:30
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या अकॅडमिक अॅडव्हायजरी बोर्डाने शनिवारी येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीला (जेडीआयईटी)
यवतमाळ : जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या अकॅडमिक अॅडव्हायजरी बोर्डाने शनिवारी येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीला (जेडीआयईटी) भेट देऊन आढावा घेतला. यावेळी संस्थेची गुणवत्ता आणखी वाढविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना बोर्डाने केल्या.
अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा आणखी वाढावा या हेतूने जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत या बोर्डाची नेमणूक करण्यात आली आहे. यात तंत्रशिक्षणात अग्रेसर जगविख्यात नामांकित संस्थांमधील संचालक तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञांचा समावेश आहे. या अॅडव्हायजरी बोर्डाची दुसरी बैठक शनिवारी ‘जेडीआयईटी’मध्ये पार पडली.
एआयसीटीईचे माजी अध्यक्ष व आयआयटी मद्रासचे माजी संचालक डॉ. आर. नटराजन, आयआयएससी बंगळुरूचे डॉ.एन.सी. शिवप्रकाश, एलएनएम इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी जयपूरचे संचालक डॉ. एस. एस. गोखले, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर मुंबईचे शास्त्रज्ञ डॉ. बी.के. दत्ता, व्हीजेटीआय मुंबईचे संचालक डॉ. ओ.जी. काकडे यांचा या बोर्डामध्ये समावेश आहे.
यावेळी विजय दर्डा, संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा, सचिव किशोर दर्डा, सदस्य अशोक जैन, अनिल पारख, मोहन जोशी आदी उपस्थित होते. बोर्डाच्या सदस्यांनी महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारती व विद्या शाखांमध्ये उपलब्ध पायाभूत सुविधा, उपकरणांची पाहणी केली. विविध विद्या शाखा प्रमुखांनी आपल्या शंकांबाबत अॅडव्हायजरी बोर्डातील सदस्यांशी चर्चा केली.
शंकांचे निरसन करताना अॅडव्हायजरी बोर्डातील सदस्यांनी संस्थेच्या आणखी प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना त्यांना केल्या. यावेळी मेकॅनिकल शाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वाहनाचे प्रात्यक्षिक सदस्यांना दाखविण्यात आले. (वार्ताहर)