महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट होणार
By admin | Published: February 24, 2015 04:28 AM2015-02-24T04:28:57+5:302015-02-24T04:28:57+5:30
अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित कराव्यात;
मुंबई : अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या त्वरित कराव्यात; तसेच महाविद्यालयामधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक बाबी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने सुधारणा करण्यासाठी सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक आॅडिट करण्याचे आदेश शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले आहेत.
राज्यातील अकृषिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू तसेच बोर्ड आॅफ कॉलेज अॅण्ड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंटचे संचालक, विभागाचे सचिव आदी अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांचा दर्जा जागतिक विद्यापीठाच्या यादीमध्ये उंचविण्यासाठी संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि त्रैमासिक आढावा योग्य पद्धतीने व कालबद्ध स्वरूपात घेण्यासाठी विद्यापीठातील कुलगुरूंची त्रैमासिक बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयांच्या कामासाठी कुलगुरू व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना वारंवार मंत्रालय आणि सहसंचालकांच्या कार्यालयात यावे लागते. ही कामे तातडीने मार्गी लागावीत यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय यांनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यांनी संबंधित विभागातील सर्व कामकाजाचा पाठपुरावा करावा आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक आणि उपसचिव यांनी विद्यापीठाच्या विविध समस्या, अडचणी आणि प्रश्न यामधून मार्ग काढावा, अशा सूचनाही तावडे यांनी दिल्या. (प्रतिनिधी)