एसीबीने घराचे क्षेत्रफळ वाढवून दाखविले !
By admin | Published: June 18, 2015 02:37 AM2015-06-18T02:37:08+5:302015-06-18T08:55:52+5:30
आपण राहत असलेल्या मुंबईतील सुखदा सोसायटीतील फ्लॅट ६५० ते ७०० फुटाचा असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात सदर
अतुल कुलकर्णी , मुंबई
आपण राहत असलेल्या मुंबईतील सुखदा सोसायटीतील फ्लॅट ६५० ते ७०० फुटाचा असताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या प्रसिद्धी पत्रकात सदर घराचे क्षेत्रफळ २,००० चौरस फूट असल्याचे म्हटले आहे, असे सांगत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी एसीबीच्या प्रेसनोटवर आक्षेप घेतला आहे. सुखदा सोसायटीत नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांचेही फ्लॅट तेवढेच आहेत, अशी पूरक माहितीही त्यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भुजबळांनी आपल्या मालमत्तेसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, मानेक महल येथील जागा पंकजच्या पणजीने मृत्युपत्राद्वारे त्याला दिली असून, त्याचे क्षेत्रफळ ८०० फुटाचे आहे. मात्र एसीबीच्या प्रेसनोटमध्ये १,२०० फूट दाखवले गेले. माझगाव येथील ७०० चौ. फुटाचे घर आपल्या ३८ वर्षांपूर्वी वारलेल्या दिवंगत भावाने त्यांच्या पत्नीच्या नावाने म्हणजे आपल्या वहिनींच्या नावाने घेतले आहे. तेथे आता आमचे भाचे राहतात. तेथे समोरच माझा फ्लॅट साधारणपणे ४५० चौरस फुटाचा आहे. तो ३० वर्षांपूर्वी घेतला आहे.
नाशिक येथे आमच्या मामाची ७ एकर जिरायत जमीन त्या वेळी नाशिक शहराच्या ५ मैल बाहेर होती. माझ्या वहिनी मामाच्या कन्या आहेत. ही जमीन ३५ ते ४५ वर्षांच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने १५ हजार रुपये एकराने आमच्या नावे करण्यात आली. त्या वेळी तेथे सिडको अथवा एकही घर आजूबाजूला नव्हते. आता ती जमीन शहराच्या मध्यभागी आली. तेथे आम्ही २५ वर्षांपूर्वी फार्म हाऊस बांधले. आता कुटुंब वाढल्याने नवीन घर बांधायला घेतले. त्या घरात मोठे कोर्ट यार्ड आहे. मोठे पोर्च आहे. तिन्ही बाजूला मोठे वऱ्हांडे आहेत. हे धरून साधारणपणे ३० हजार चौ. फूट एकूण क्षेत्र होते. आता या घराच्या बांधकामासाठी १,५०० रु. फूट आणि फर्निचर व इतर गोष्टीसाठी ३,००० फूट खर्च येईल. हे पाहाता याची किंमत साधारणपणे १० कोटी होऊ शकते. ती एकदम १०० कोटी दाखविण्यात आली आहे.
सांताक्रूझ येथील मालमत्ता जेथे पंकज आणि समीर राहतात, ही मालमत्ता कुणाची व्यक्तिगत नाही. मुंबईत जुन्या इमारतींच्या रिडेव्हलपेमेंट योजनेखाली अनेक विकासक करतात त्याप्रमाणे येथील जुन्या चाळीचे रिडेव्हलपेमेंट केले आहे. त्यातील काही घरे जुन्या भाडेकरूंना देऊन बाकीची विकणे आहे. तूर्त त्या विकाऊ सदनिकेत पंकज व समीर राहतात.
येवला येथे माझे आणि मनमाड येथे आ. पंकज यांचे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्क कार्यालय असून, तेच राष्ट्रवादी पक्षाचेही कार्यालय आहे. त्याप्रमाणे मतदारसंघात मुक्काम करण्याच्या दृष्टीने तेथे निवासाची सोय आहे.
काळाच्या ओघात या सर्व मालमत्तांच्या किमती वाढल्या. आम्ही हे सर्व इन्कम टॅक्स व इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून केले आहे. आजही पोलिसांना आम्ही सर्व जुनी कागदपत्रे, नोंदी दाखवण्यास तयार आहोत; परंतु दुर्दैवाने त्या अगोदरच आमच्या विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी सांगितलेल्या किमती गृहीत धरून त्यांना प्रसिद्धी दिली जात आहे. चौकशी जरूर करा, पण आम्ही न केलेले गुन्हे आमच्यावर लादून बदनामी करू नका, असा इशाराही भुजबळ यांनी दिला आहे.