एसीबीची हेल्पलाईन लयभारी !
By Admin | Published: January 4, 2015 01:02 AM2015-01-04T01:02:49+5:302015-01-04T01:02:49+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेली हेल्पलाईन ‘लयभारी’ ठरली आहे. १०६४ क्रमांकाच्या या हेल्पलाईनवर सहा महिन्यात २७०० कॉल्सवजा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या आधारे २७ सापळे
६ महिन्यात २७ सापळे : २७०० तक्रारी
नरेश डोंगरे - नागपूर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सुरू केलेली हेल्पलाईन ‘लयभारी’ ठरली आहे. १०६४ क्रमांकाच्या या हेल्पलाईनवर सहा महिन्यात २७०० कॉल्सवजा तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या आधारे २७ सापळे यशस्वी करण्यात एसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.एसीबीचे डीजी (महासंचालक) म्हणून अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सहा महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले. हेल्पलाईन हा त्यातीलच एक भाग. १०६४ या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन करा, फोन करून अपसंपदा जमविणारे, भ्रष्टाचार करणारे यांची ठोस माहिती द्या, असेही सुचविण्यात आले. त्याचा चांगला फायदा झाला. अवघ्या ६ महिन्यात हेल्पलाईनवर २६९९ कॉल्स आलेत. त्यातील अनेक कॉल्स चुकीची माहिती देणारे असले तरी २७ जणांनी अगदी तंतोतंत माहिती दिली. त्याचा फायदा उचलत एसीबीच्या राज्यभरातील युनिटने रचलेले २७ सापळे यशस्वी झाले.
नागपुरात महिन्याला ३००
नागपूर विभागात या हेल्पलाईनवर २४ तासात साधारणत: ८ ते १२ कॉल्स येतात. अर्थात्, महिन्याला साधारणत: ३०० फोन कॉल्स प्राप्त होतात. यातील अनेक कॉल्स नुसते भंडावून सोडणारे असतात. अनेकजण फालतूची चौकशीही करतात. मात्र, काही कॉल्स करणारी मंडळी भ्रष्ट लोकसेवकांना पकडण्यासाठी कामी येईल, अशी माहिती देतात. अधिकारी या माहितीचा उपयोग चौकशीसाठी करतात. चौकशीचे रूपांतर कारवाईच्या यशस्वीतेत होते.
सर्वाधिक लाभ नागपूरला
एसीबीच्या हेल्पलाईनचा सर्वाधिक लाभ नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उचलला. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक फोन (कॉल) वरून मिळालेल्या माहितीची कसून तपासणी केली.
त्याआधारे नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई, पुण्याला मागे सारत गोंदियात ११ आणि नागपूरमध्ये ६ सापळे यशस्वी करून दीड डझन भ्रष्ट लोकसेवकांच्या मुसक्या बांधल्या. भंडारा २, अमरावती १, मुंबई ३, सोलापूर, जालना, बीड आणि उस्मानाबाद असे प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण २७ सापळे यशस्वी करून ३५ पेक्षा जास्त भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करण्यात हेल्पलाईनचा फायदा झाला. (प्रतिनिधी)