जलयुक्तशिवार योजनेतील गैरव्यवहारांची एसीबी चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:06 AM2019-07-02T02:06:17+5:302019-07-02T02:06:30+5:30
जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या एसीबी चौकशीचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी राज्य सरकारला दिले.
मुंबई : जलयुक्त शिवार योजनेतील कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या एसीबी चौकशीचे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी राज्य सरकारला दिले.
जलयुक्त शिवार योजनेच्या १३०० कामांबाबत तक्रारी आहेत. पुरंदर तालुक्यात गैरव्यवहार झाल्याची कबुली मंत्र्यांनी सभागृहात दिली होती. या गैरव्यवहारांची एसीबी चौकशी करण्यास कृषी आयुक्तांनीच लेखी विरोध केल्याने अनियमितता लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करून, विरोधकांनी एसीबी चौकशीची मागणी केली होती.
एसीबीला तांत्रिक बाजू समजणार नाही. विभागीय चौकशी सुरू असून अहवालापूर्वी कारवाई केल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची होईल, असा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. यावरून त्यानंतर सभापतींनी हा प्रश्न राखून ठेवला होता. आज हा प्रश्न पुन्हा चर्चेस आल्यावर विरोधकांनी एसीबीची मागणी लावून धरल्यानंतर सभापतींनी तसे निर्देश दिले.