गुवाहाटीतून शिंदेंना सोडून ठाकरेंकडे परतेलेले आमदार नितीन देशमुखांना ACB ची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 05:36 PM2023-01-09T17:36:44+5:302023-01-09T17:37:10+5:30
१७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे.
अमरावती - ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना ACB नं नोटीस बजावली असून १७ जानेवारीला देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ठाकरे गटाचे राजन साळवी यांना एसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. आता नितीन देशमुखांना एसीबीनं नोटीस बजावल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
याबाबत आमदार नितीन देशमुख म्हणाले की, १७ तारखेला अमरावतीत लाचलुचपत विभागाकडे चौकशीसाठी हजर राहावे यासाठी नोटीस दिली आहे. मालमत्तेच्या विवरण पुराव्यासोबत हजर राहण्यास सांगितले आहे. १७ तारखेला मी रितसर कार्यालयात हजर राहीन. आरोप कुणी करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. एका आमदाराला नोटीस देताना तक्रार कुणी दिली याचा उल्लेख नाही. माझ्याजवळील कुठली प्रॉपर्टी अवैध आहे याचीही माहिती नाही. याबाबत मी लेखी खुलासा १७ तारखेला चौकशीसाठी हजर झाल्यावर करेन असं देशमुखांनी स्पष्ट केले.
त्याचसोबत तक्रारकर्त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर मला नोटीस दिली आहे. ज्यावेळी तक्रारकर्त्याचे नाव समोर येईल तेव्हा सगळे स्पष्ट होईल. तक्रारकर्त्याला कुणी तक्रार देण्यास भाग पाडलं. तक्रार कुणी द्यायला लावली हे सर्व मी पुराव्यानिशी सादर करेन असं सांगत नितीन देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
कोण आहेत नितीन देशमुख?
नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. गत तीन टर्मपासून भारिप-बमसंकडे असलेल्या या मतदारसंघात नितीन देशमुख यांनी शिवसेनेचा भगवा फडकविला आहे. राज्यातील सत्तानाट्यात नितीन देशमुखांचे नाव प्रामुख्याने समोर येते. एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले नितीन देशमुख हे तिथून सुटून थेट उद्धव ठाकरेंकडे पोहचले होते. ठाकरेंकडे पोहचताच नितीन देशमुखांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप लावले होते.
एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून भाजपानेच हे षडयंत्र रचले आहे, असा आरोप आमदार नितीन देशमुखांनी करत मी निवडून आलो असलो तरी शिवसेनेचा उमेदवार म्हणून निवडून दिलं आहे त्यामुळे मी निष्ठावान शिवसैनिक, प्राण असेपर्यंत शिवसेनेशी इमान कायम ठेवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मुंबई, सुरत, गुवाहाटी ते नागपूर असा संपूर्ण घटनाक्रम विशद करून आ. देशमुख यांनी हा सगळा प्रकार भाजपानेच घडवून आणल्याचा दावा केला होता.