बांधकाम अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर एसीबीचे छापे
By Admin | Published: June 14, 2015 01:57 AM2015-06-14T01:57:16+5:302015-06-14T01:57:16+5:30
बांधकाम खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या
मुंबई : बांधकाम खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह गुन्हे दाखल झालेल्या आजी-माजी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटयवधी रुपयांची अपसंपदा आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
यात बांधकाम खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे (औरंगाबाद), माजी सचिव माणिक हिरामण शहा (पुणे), निवृत्त सचिव देवदत्त मराठे (नागपूर), अधीक्षक अभियंता अनिलकुमार गायकवाड (ठाणे), एमएसआरडीसीचे निवृत्त उपअभियंता अरुण देवधर (नागपूर) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता गजानन सांवत (मुंबई) यांचा समावेश आहे. या सर्वांची बँक खाती आणि लॉकर्स एसीबीने सील केले आहेत. तसेच त्यांना कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. सुत्रांनी सांगितले की, या छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात सोने आढळले. शिवाय फ्लॅट, भूखंड आणि शेतजमिनीमध्येही गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. या सर्वांचे जाबजबाब एसीबीने नोंदविले आहेत. काही जणांची परराज्यातदेखील संपत्ती असून संपूर्ण तपशील एकत्र करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (विशेष प्रतिनिधी)