एसीबी, एसआयडीला पूर्णवेळ वाली नाहीच! सेवाज्येष्ठ कनकरत्नम यांना डावलले, अतुलचंद्र कुलकर्णीही सध्याच्याच पदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:47 AM2018-07-31T01:47:43+5:302018-07-31T01:47:55+5:30
ठाणे, पुणे, नवी मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांसह ११ अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करून राज्य सरकारने या वर्षातील पोलिसांच्या सर्व स्तरावरील बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला.
- जमीर काझी
मुंबई : ठाणे, पुणे, नवी मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तांसह ११ अपर महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करून राज्य सरकारने या वर्षातील पोलिसांच्या सर्व स्तरावरील बदल्यांचा प्रश्न मार्गी लावला. मात्र महत्त्वपूर्ण असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) व राज्य गुप्त वार्ता विभागाचे (एसआयडी) प्रमुखपद पूर्णवेळ अधिकाºयांपासून रिक्त ठेवले आहे. अनुक्रमे दोन वर्षे व १६ महिन्यांपासून या पदांना पूर्णवेळ वाली मिळालेला नाही. त्याचप्रमाणे अपर महासंचालकामध्ये सर्वांत सेवाज्येष्ठ असलेल्या डी. कनकरत्नम यांना डावलण्यात आले आहे. तर एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनाही सध्याच्या पदावर कार्यरत ठेवण्यात आले आहे.
‘एफएसएल’चे प्रमुख एस.पी. यादव हे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत असून त्यानंतर कनकरत्नम यांना पदोन्नती तर कुलकर्णी यांच्याकडे अन्य महत्त्वाच्या विभागाची धुरा सोपविली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र प्रमुख दोन पदे रिक्त ठेवणे आणि अधिकाºयाला डावलण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेमुळे त्यांचा ‘पारदर्शी कारभार’ पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
पोलीस मुख्यालयात पोलीस महासंचालक यांच्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर महासंचालकपद शक्तिशाली मानले जाते. मुंबईचे आयुक्त वगळता अन्य सर्व आयुक्तालये व अधीक्षक कार्यालयांना त्यांना ‘रिपोर्टिंग’ करावे लागते. त्यामुळे या पदाची जबाबदारी मुख्यालयाच्या इमारतीतील ‘डीजी’नंतर सेवाज्येष्ठ असलेल्या अधिकाºयांवर सोपविली जाते.
गेल्या वर्षी २१ डिसेंबरला तत्कालीन ‘एल अॅण्ड ओ’ बिपीन बिहारी यांची महासंचालकपदी बढती झाल्यानंतर त्या जागेवर त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेले नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख डी. कनकरत्नम यांचा क्रमांक होता. त्यांची वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा वर्तवण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने या पदावर त्यांची निवड न करता बिहारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार ठेवला होता.
सोमवारी झालेल्या बदल्यांमध्ये त्यांची या पदावर नियुक्ती केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्यापेक्षा एका वर्षाने ज्युनियर असलेले परमबीर सिंह यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
- राज्य पोलीस दलामध्ये पोलीस महासंचालक व मुंबईच्या आयुक्तपदानंतर महत्त्वाचे समजले जाणारे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपदही ३० जुलै २०१६ पासून रिक्त आहे. तर राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्तपदी गेल्या वर्षीच्या १४ मार्चपासून पूर्णवेळ अधिकारी भरण्यात आलेला नाही. मुंबई आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या सुरक्षा महामंडळाचे महासंचालक संजय बर्वे यांच्याकडे त्याचा अतिरिक्त प्रभार आहे. एसीबीचा अतिरिक्त पदभार फणसाळकर यांच्याकडे होता.