एसीबीची धुरा सतीश माथूर यांच्याकडे?
By admin | Published: February 22, 2016 01:02 AM2016-02-22T01:02:59+5:302016-02-22T01:02:59+5:30
गेल्या महिन्यात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर आले आणि त्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता चर्चा रंगलीये ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक
- जमीर काझी, मुंबई
गेल्या महिन्यात मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर आले आणि त्याविषयीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्यामुळे आता चर्चा रंगलीये ती म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीचे नवीन महासंचालक कोण होणार? याची. येत्या महिनाअखेरीस विजय कांबळे सेवानिवृत्त होत आहेत. कांबळे यांच्या जागी पोलीस गृहनिर्माण विभागाचे कार्यकारी संचालक सतीश माथुर व गृहरक्षक दलाचे महासमादेशक राकेश मारिया यांच्यात स्पर्धा आहे. तथापि, माथूर यांचे पारडे जड असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
नव्या बदलांमध्ये पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांनाही महासंचालकपदी बढती दिली जाणार आहे. पाठक यांच्याकडे ‘फॉरेन्सिक’चा पदभार सोपविला जाईल. मीरा बोरवणकर यांची ‘हाउसिंग’ला बदली केली जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.
पाठक यांना महिन्याचा कालावधी
विजय कांबळे २९ फेबु्रवारीला निवृत्त होत असल्याने डीजी या रिक्त झालेल्या पदावर पुण्याचे आयुक्त के. के. पाठक यांचे प्रमोशन निश्चित आहे. ते १९८४च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असून, ३१ मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना जेमतेम एक महिन्याचा अवधी मिळणार आहे. गेल्या एप्रिलपासून पाठक हे पुण्याच्या आयुक्तपदी कार्यरत आहेत.
कुलकर्णी, रंजन यांची चर्चा
पाठक यांना बढती मिळाल्यानंतर पुण्याच्या आयुक्तपदासाठी मुंबईचे गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी व नवी मुंबईचे आयुक्त प्रभात रंजन यांच्या नावाची गृह विभागात चर्चा आहे. कुलकर्णी यांना ३१ डिसेंबरला अपर महासंचालकपदावर पदोन्नती मिळूनही अद्याप त्यांच्याकडे सहआयुक्ताचा पदभार आहे. त्यामुळे त्यांची पाठक यांच्या जागी किंवा रंजन यांची पुण्याला नियुक्ती झाल्यास कुलकर्णी यांच्याकडे नवी मुंबईची धुरा दिली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मारियांच्या तपासावर शिक्कामोर्तब
शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीकडे सातत्याने कसून चौकशी केल्यानेच मारिया यांना आयुक्तपदावरून हलविण्यात आले
होते. मात्र सीबीआयने केलेल्या चौकशीत
पीटर दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने
मारिया यांचा तपास योग्य दिशेने होता, हे न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रातून स्पष्ट झाले आहे.