"हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा", आदित्य ठाकरेंचं थेट राज्य सरकारला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:38 PM2024-07-12T16:38:52+5:302024-07-12T16:42:35+5:30
Aaditya Thackeray : हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.
मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्याठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. तसेच, अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत, त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य कराव्या, असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.
शुक्रवारी आदित्य ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच, या खोके सरकारचे देखील शेवटचे अधिवेशन आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडले आहेत. त्या ठिकाणी ठेकेदारांची नेमणूक करून सरकारने तो प्रश्न मार्गी लावावा. अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत. अनेक ठिकाणी G+1, G+2 अशा झोपडपट्ट्या पाहायला मिळत आहेत. त्यांना देखील पात्रता यादीत सहभागी करून घ्यावे. हिंमत असेल तर आमच्या या मागण्या मान्य करा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
या सरकारने गाजर अर्थसंकल्प मांडला असून या अर्थसंकल्पात मुंबईला काहीही मिळाले नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी तब्बल सहा हजार कोटींचा घोटाळा आम्ही जनतेसमोर आणला होता. तरी देखील सत्ताधारी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबईत बोलवून १८ जानेवारीला विविध प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, मात्र त्यापैकी एकही रस्ता सुरू झाला नाही. त्यासंदर्भात अनिल परब यांनीही हक्कभंग आणला होता, असे आदित्य ठाकरे यांनी सांगत राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला.
याचबरोबर, महायुती सरकार कोस्टल रोड देखील पूर्णपणे सुरू करू शकले नाही. जे काम सुरू आहे त्यांचे खोटे भूमिपूजन करायला पंतप्रधानांना मुंबईत आणले जात आहे. हे सत्ताधारी पक्ष मोदी यांचे नाव बदनाम करत आहेत, त्यामुळे तुम्ही याकडे जरा लक्ष द्या आणि योग्य ती कारवाई करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज विधान भवनाला वंदन केलं आहे. विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी जाता जाता पायरीला स्पर्श करत विधान भवनाला वंदन केले.