१४ जानेवारीपासून हजसाठी अर्ज स्वीकृती
By Admin | Published: December 28, 2015 04:01 AM2015-12-28T04:01:29+5:302015-12-28T04:01:29+5:30
हज यात्रा २०१६साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया हज कमिटी आॅफ इंडिया १४ जानेवारीपासून सुरू करणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे.
औरंगाबाद : हज यात्रा २०१६साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया हज कमिटी आॅफ इंडिया १४ जानेवारीपासून सुरू करणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे. मागील वर्षीप्रमाणे आॅनलाइन आणि मॅन्युअल दोन्ही पद्धतींत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रेहमान यांनी या योत्रेसाठीचा अॅक्शन प्लॅन घोषित केला आहे. हज यात्रेसाठी केंद्रीय हज कमिटी कोणत्या बाबी करणार आहे, याचा संपूर्ण तपशील देण्यात आला. तीन-चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील १० हजारहून अधिक यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी मिळत होती. केंद्रीय हज कमिटीने महाराष्ट्राचा कोटा कमी केल्याने मागील काही वर्षांपासून फक्त ८ हजार भाविक रवाना होत आहेत. मागील दोन-तीन वर्षांपासून हज यात्रेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या चार ते पाच पटीने वाढली आहे. सुमारे पन्नास हजार अर्ज दरवर्षी हज कमिटीला प्राप्त होतात. सलग तीन वर्षे अर्ज करणाऱ्या यात्रेकरूंना चौथ्या वर्षी थेट हजला जाण्याची संधी देण्यात येते. ७० वर्षांपुढील भाविकांनाही ड्रा पद्धतीतून बाजूला ठेवण्यात येते. त्यांनाही थेट हजची संधी प्राप्त होते.