कॅनडाहून आलेले ३०० कोटी स्वीकारले, दिग्विजय सिंग यांचा केजरीवालांवर आरोप
By admin | Published: August 27, 2016 07:36 PM2016-08-27T19:36:41+5:302016-08-27T19:36:41+5:30
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कॅनडाहून ३०० कोटी रुपयांची देणगी स्वीकारली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 27 - आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी कॅनडाहून ३०० कोटी रुपयांची देणगी स्वीकारली असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे. हे पैसे त्यांनी रोख स्वरूपात स्वीकारल्याचे म्हटले आहे.
प्रशासनात पारदर्शता आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाच्या गोष्टी करणारे अरविंद केजरीवाल यांनी स्वत: अपारदर्शी कारभार ठेवला आहे. पक्षासाठी कॅनडाहून आलेली ३०० कोटी रुपयांची देणगी केजरीवाल यांनी रोखड स्वरूपात स्वीकारली आहे. पक्षाचे खाते नाही आणि खजिनदार नाही या सबबीवर त्यांनी हा निधी कॅश स्वरूपात घेतला असल्याचे दिग्वीजय यांनी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
केजरीवाल यांचा स्वच्छ प्रशासनाचा दावा ही केवळ भूलथाप असून दिल्लीत या सरकारने स्वैर कारभार चालविला आहे. संसदीय सचिवांच्या नियुक्तीच्या बाबतीतही पारदर्शकता राखलेली नाही. कायदेशीर प्रक्रियाही पार पाडली गेली नाही असे त्यांनी सांगितले. गोव्यात आम आदमी पार्टीने बँक खाते खोलले आहे का याची लोकांनी खात्री करून घ्यावी असा टोलाही त्यांनी हाणला.
‘मोदी, वाजपेयीही पाकिस्तानमध्ये गेले होते’
पाकिस्तानात जाणे म्हणजे नरकात जाणे असे जे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना आताच का वाटते असा प्रश्न दिग्विजय सिंग यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीही पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यावेळी पर्रीकर का बोलले नाहीत. वाजपेयी यांनी लाहोर ते भारत बस सुरू केली होती तेव्हा का बोलले नाहीत असा प्रश्नही त्यांनी केला.