४0 हजाराची लाच स्वीकारताना व्यवसाय कर अधिकारी गजाआड
By admin | Published: April 10, 2015 02:33 AM2015-04-10T02:33:24+5:302015-04-10T08:49:56+5:30
व्यवसाय कर कमी करण्यासाठी स्वीकारली लाच.
अकोला : दोन प्रकरणांमध्ये व्यवसाय कर कमी करून देण्यासाठी प्रत्येकी २0 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या विक्रीकर कार्यालयामधील व्यवसाय कर अधिकारी विनोद नथ्थुपंत निकम याला गुरुवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. शहरातील एका व्यावसायिकाने विनोद निकम (वय ४0, रा. सटाणा जि. नाशिक) याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार, तक्रारकर्त्याचे दोन व्यवसाय असून, त्यावरील १ लाख ४0 हजार रुपयांचा कर भरण्यासाठी विक्रीकर कार्यालयाकडून नोटीस पाठविण्यात आली होती. व्यवसाय कराची रक्कम कमी करून देण्यासाठी व्यवसाय कर अधिकारी विनोद निकम याने तक्रारदाराकडे प्रत्येकी २0 हजार, अशी ४0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच न दिल्यास दंड, करावरील व्याज लावून रक्कम भरावी लागेल, असा दमही निकम याने दिल्यानंतर त्यांच्यात तडजोड होऊन अखेर ४0 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार गुरुवारी निकमच्या कार्यालयामध्ये रक्कम देण्याचे ठरले. याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी आधीच सापळा रचला होता. विनोद निकमने ४0 हजार रुपये स्वीकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. निकम याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे कलम ७, १३ (१), ९, १३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*२00३ मध्येही स्वीकारली होती लाच
लाचखोर विनोद निकम हा विक्रीकर निरीक्षक म्हणून मुंबईत कार्यरत असताना, २00३ मध्ये त्याने लाच स्वीकारली होती. त्यावेळीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु २0१0 साली न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली. २0११ पासून पदोन्नतीवर निकम अकोला विक्रीकर कार्यालयात रुजू झाला. गुरूवारी त्याने पुन्हा लाच स्वीकारली आणि गजाआड झाला.
*दोन हजार व्यावसायिकांना नोटीस
व्यवसाय कर भरण्यासाठी विभागाने जिल्हय़ातील दोन हजार व्यावसायिकांना नोटीसेस बजावल्या आहेत. त्यापैकी बर्याच व्यापार्यांकडून आधीच लाच स्वीकारण्यात आल्याची माहिती आहे. ज्या व्यावसायिकांनी कर कमी करण्यासाठी लाच दिली असेल, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रारी कराव्यात, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक उत्तमराव जाधव यांनी केले.