लाच स्वीकारताना ग्रामसेवक, उपसरपंचास अटक
By admin | Published: December 6, 2015 02:25 AM2015-12-06T02:25:28+5:302015-12-06T02:25:28+5:30
लाचखोरीच्या आरोपात लोकप्रतिनिधी अटक केल्याची वाशिम जिल्ह्यातील पहिलीच घटना
रिसोड : वडिलोपार्जीत जागेची नोंद ग्रामपंचायतच्या दप्तरी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या ग्रामसेवकासह उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहात पकडले. ही घटना ५ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. घोणसर येथील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, घोणसर येथील वडिलोपार्जीत जागेची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर केला होता. नोंदणी करण्यासाठी ग्रामसेवक विनोद सुभाष भुरकाडे व उपसरपंच अंबादास शंकर कराळे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी दोन हजार नोंद करण्यापूर्वी व उर्वरित रक्कम नोंद झाल्यानंतर देण्याचे ठरले. शनिवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयातच उपसरपंच अंबादास कराळ यांनी ग्रामसेवक विनोद भुरकाडे यांना ठरलेली रक्कम देण्यास सांगितले. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली होती. शनिवारी तक्रारदाराने ग्रामसेवकाकडे रक्कम देताच एसीबीच्या पथकाने ग्रामसेवक व उपसरपंचाला ताब्यात घेतले. कारवाई पोलीस अधीक्षक महेश चिमोटे, अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम.जी. रुईकर वाशिम यांच्या पथकाने केली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत शासनाच्या अनेक योजना राबविल्या जातात. यामध्ये भ्रष्टाचारसुद्धा मोठय़ा प्रमाणात होत असतो. भ्रष्टाचारामध्ये अधिकार्यांसोबत पदाधिकारीसुद्धा सारखेच सहभागी असतात; परंतु कारवाई दरम्यान पदाधिकारी अलगद बाहेर निघून जातात. घोणसर येथील प्रकरणात उपसरपंचाला अटक करण्यात आली असून, ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.