रुग्णाच्या दोनच नातेवाइकांना प्रवेश
By admin | Published: June 11, 2016 04:24 AM2016-06-11T04:24:14+5:302016-06-11T04:24:14+5:30
रुग्णालयांत केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकांना दिला
मुंबई : रुग्ण दगावल्यावर रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी आणि महापालिका रुग्णालयांत केवळ दोनच नातेवाइकांना रुग्णाला भेटण्याची मुभा द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकार व महापालिकांना दिला.
याच महिन्यात नागपूर व मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांनी मारहाण केल्याच्या घटना शुक्रवारी मार्डच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. त्यावर खंडपीठाने ही बाब गंभीर असून, यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे म्हटले. आम्ही आदेश दिल्यानंतरही अशा घटना घडल्या असतील तर राज्य सरकारला उत्तर देणे बंधनकारक आहे. वास्तविकता प्रत्येक सरकारी आणि महापालिका रुग्णालयांमध्ये २४ तास पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे. राज्य सरकारने याचा विचार करावा. तसेच या रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसवून कंट्रोल रूमही असाव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने सरकारला केली.
डॉ. तात्याराव लहाने यांच्या विरोधात अफाक मालविया यांनी केलेल्या याचिकेतही हा मुद्दा
आहे. (प्रतिनिधी)
>अंमलबजावणी करा
३ जुलै २०१५ ला राज्य सरकारने शासकीय आणि महापालिका रुग्णालयांत रुग्णांला भेटण्यासाठी एकावेळी दोनच नातेवाइकांना पाठवावा, असे परिपत्रक काढले.
त्याची तातडीने अंमलबजावणी करा आणि तसे फलक प्रत्येक रुग्णालयात लावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.