‘सुगम्य शिक्षण हा शिक्षण धोरणाचा अविभाज्य भाग’
By admin | Published: September 18, 2016 05:00 AM2016-09-18T05:00:43+5:302016-09-18T05:00:43+5:30
सुगम्य शिक्षण हा दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी मदत करणाऱ्या नवीन शिक्षण धोरणाचा अविभाज्य भाग आहे.
मुंबई : सुगम्य शिक्षण हा दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी मदत करणाऱ्या नवीन शिक्षण धोरणाचा अविभाज्य भाग आहे. सुगम्य शिक्षण या योजनेअंतर्गत, शाळांमध्ये सहज हिंडता फिरता यावे यासाठी रॅम्प्स, सोयीची शौचालये, आवश्यक शिक्षक मदतनीस आणि विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी आर्थिक साहाय्य पुरविले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी दादर येथील ११६ वर्षे जुन्या कमला मेहता अंधशाळेला भेट दिली. या वेळी त्यांनी सर्वसमावेशक विकास आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.
शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर जावडेकर म्हणाले, या ११६ वर्षे जुन्या संस्थेला भेट दिल्यामुळे सर्वसमावेशक विकासासाठी काम करण्याची नवी ऊर्जा मला मिळाली आहे. ते म्हणाले की, ‘सबका साथ सबका विकास’ घोषवाक्यानुसार दलित, गरीब, वंचित आणि उपेक्षित लोकांच्या विकासाकरिता सरकार वचनबद्ध आहे. राज्यातील शाळांमध्ये ४६ हजार दिव्यांग मुलांची नोंदणी झालेली आहे आणि उर्वरित सर्व मुलांना शोधून त्यांना शालेय शिक्षण व्यवस्थेत सामावून घेतले जाईल. शिक्षणामुळे मिळणारा आत्मविश्वास जीवनातील यशासाठी स्प्रिंग बोर्डसारखे काम करतो. (प्रतिनिधी)