Accident: ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटेची घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:39 AM2023-04-16T07:39:47+5:302023-04-16T07:40:54+5:30

Accident News: मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ तरुणींचा समावेश आहे.

Accident: 13 boys and girls of the Dholtasha team died due to the driver's nap, an early morning incident on the Mumbai-Pune National Highway. | Accident: ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटेची घटना

Accident: ढोलताशा पथकातील १३ मुले-मुली चालकाच्या डुलकीने मृत्यूच्या खाईत, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर पहाटेची घटना

googlenewsNext

 खोपोली (रायगड) : मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन परतत असताना खासगी बस २०० फूट दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये  ३ तरुणींचा समावेश आहे.

चालक वगळता सर्व जण १७ ते २४ वयोगटातील आहेत. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीनजीक पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी चालकाला डुलकी लागल्याने भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुर्घटना घडल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. 

बसमध्ये ६ मुलींसह एकूण ४२ जणांचा समावेश होता. त्यापैकी दोघे खोपोली वगळता अन्य सर्व जण मुंबईतील गोरेगाव परिसरातील आहेत. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटपून तेथून परतत असताना झोपेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. व्हीलवरील नियंत्रण सुटून भरधाव बस दोनशे फूट खोल दरीत कोसळली. 

अपघातातील मृतांची नावे अशी  : जुई सावंत (वय १८, दिंडोशी, गोरेगाव), यश यादव (१७), ढाेलताशा पथकप्रमुख सतीश धुमाळ (वय २३), वीर मांडवकर (१२), वैभवी साबळे (२०), स्वप्नील धुमाळ (१६), मनीष राठोड (२४), कृतिक लोहित (१६), राहुल गोठण (१७), अनिकेत जगताप (२६, सर्व गोरेगाव), हर्षदा परदेशी (१९, माहीम, मुंबई), अभय साबळे (१९, मालाड) व बसचालक हरीरतन सोपान यादव (४०, रा. जोगेश्वरी).

मृतांच्या वारसांना ७ लाखांची मदत 
राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट घेऊन त्यांनी जखमींची विचारपूस केली. मृत्युमुखी पडलेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीअंतर्गत प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली.  

मुलांचे मृतदेह पाहून नातलगांचा आक्रोश 
 मुंबई : जुन्या मुंबई- पुणे महामार्गावर शिंग्रोबा खिंडीजवळ झालेल्या अपघातात वीर बाजीप्रभू ढोल- ताशा पथकातील सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, यश यादव, कृतिक लोहीत, राहुल गोठण यांच्या मृत्यूची वार्ता कळताच  दिंडोशीत शोककळा पसरली. अख्खी वस्ती हळहळली. सर्वत्र शोकाकुल वातावरण होते. तेथे चूलही पेटली नाही. जसजसे मुलांचे मृतदेह घरी आणण्यात आले, तसा नातलगांच्या आक्रोशाने प्रत्येकाचे डोळे पाणावले.    
शिवनेरी सहकारी सोसायटीतील राहुल गोटलचा मृतदेह संध्याकाळी त्याच्या घरी आला, तेव्हा आईने हंबरडा ऐकून साऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. नातेवाईक, महिला, परिसरातील नागरिकांनी तेथे गर्दी केली होती. राहुलने नुकतीच अकरावीची परीक्षा दिली होती. सतीश धुमाळ, स्वप्निल धुमाळ, जुई सावंत, वीर मांडवकर, राहुल गोठण यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार होणार आहेत. यश यादव, कृतिक लोहित यांचे नातेवाईक गावावरून येणार असल्याने त्यांचे मृतदेह जोगेश्वरी ट्रामा सेंटर येथे ठेवण्यात आले आहेत. 
संतोष नगरपालिका वसाहतीतील के सेक्टर येथील चाळीत राहणाऱ्या वीर कल्पेश मांडवकर या लहानग्याचा मृतदेह सायंकाळी घरी आणला. तेव्हा मामाला दु:ख अनावर झाले. चाळीत सर्वत्र वावरणाऱ्या वीरचे अंत्यदर्शन घेण्यासाठी नातलग- मित्रपरिवाराने गर्दी केली होती. आई-वडील गावावरून यायचे असल्याने रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार होतील, असे नातलगांनी सांगितले.

Web Title: Accident: 13 boys and girls of the Dholtasha team died due to the driver's nap, an early morning incident on the Mumbai-Pune National Highway.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.