कर्नाटकमध्ये अपघात; ५ ठार
By admin | Published: January 29, 2016 01:47 AM2016-01-29T01:47:13+5:302016-01-29T01:47:13+5:30
कर्नाटकमधील कुस्तगी (जि. कोप्पल) येथे बुधवारी रात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनरच्या धडकेत नगरमधील पाच जण जागीच ठार, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.
अहमदनगर : कर्नाटकमधील कुस्तगी (जि. कोप्पल) येथे बुधवारी रात्री झालेल्या टेम्पो ट्रॅव्हल व कंटेनरच्या धडकेत नगरमधील पाच जण जागीच ठार, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत. हे सर्व रुईछत्तीसी (ता. नगर) येथील रहिवासी आहेत.
इकबाल (मुन्नाशेठ) हसन शेख (४०), मदीना इस्माईल शेख (५०), तय्यब इस्माईल शेख (१०), जमीर उर्फ राजू शेख (५०), युनुस तायर शेख (४३, चालक) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर बागलकोट व इक्काल या शहरांतील दवाखान्यांत उपचार सुरू आहेत, असे कुस्तगी येथील पोलिसांनी सांगितले.
रुईछत्तीसी येथील इकबाल हसन शेख ऊर्फ मुन्नाशेठ हे त्यांचे कुटुंब व नातेवाईकांसमवेत २६ जानेवारीला म्हैसूर येथे लग्नकार्यासाठी टॅम्पो ट्रॅव्हलने गेले होते. गाडीत एकूण १५ जण होते. विजापूरहून ते बुधवारी पुढच्या प्रवासाला निघाले. विजापूर-हॉसपेट या राष्ट्रीय महामार्गावरून म्हैसूरकडे जात असताना बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुस्तगी गावानजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकवर (कंटेनर) त्यांची गाडी आदळली. अपघाताची माहिती गुरुवारी सकाळी गावात पसरल्यानंतर रुईछत्तीसी येथे दिवसभर बंद पाळण्यात आला. (प्रतिनिधी)