खालापूर-पेण मार्गावर अपघात
By Admin | Published: June 9, 2017 02:53 AM2017-06-09T02:53:50+5:302017-06-09T02:53:50+5:30
खालापूर-पेण मार्गावरील सावरोली हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने ट्रेलर थेट एका कारला धडकून कार्यालयात घुसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वावोशी : मुंबई-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या खालापूर-पेण मार्गावरील सावरोली हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने ट्रेलर थेट एका कारला धडकून कार्यालयात घुसला. या घटनेत सुदैवाने कारमालक व येथील सुपरवायझर बचावला. तसेच या ठिकाणीची चहा नाष्ट्याची टपरी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार व कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
खालापूर- पेण हा महामार्गाला जोडरस्ता असल्याने या मार्गावरून जुन्या राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गावरून अनेक कारखान्यांचे कंटेनर ये-जा करीत असतात. गुरु वारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - पुणे द्रुतगती मागावरून रांजणगाव येथन माल खाली करून कंटेनर क्र . एम एच ४३ वाय.७०६१ चा चालक अंबादास खेडकर खालापूर पेण या जोड रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी भरधाव वेगात जुन्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना, सावरोली हद्दीत पाताळगंगानजीक शिवसेना नेते गोविंद बैलमारे यांच्या वीटभट्टी लगतच्या कार्यालयात घुसला. या ठिकाणी राजेंद्र घोसाळकर हे व्यावसायिक आपली कार क्र . एम एच ०६ ए एन २६८ ही रस्त्याच्या बाजूला लावून येथील सुपरवायझर अशोक दळवी यांच्याबरोबर बोलत होते. याच दरम्यान सावरोली गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरवरील चालक अंबादास खेडकर यांचा वळणावर गाडीवरील ताबा सुटून ट्रेलर येथे उभ्या असणाऱ्या कारला मागून धडकला, तो थेट कार्यालयात घुसला.
याच दरम्यान कार मालक राजेंद्र घोसाळकर व सुपरवायझर अशोक दळवी काही क्षणापूर्वी कारपासून दोन फूट बोलत बाजूला गेल्याने, बचावले. तर याच कार्यालयाबाहेर असलेली चाहा नाष्ट्याची टपरी या वेळेस बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.
या अपघातातील चालक अंबादास खेडकर याने आपला डोळा लागल्याचे सांगत गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे कबूल केले. अपघातात कारचे व कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
>कार आराम बसच्या धडकेत पाच जखमी
बिरवाडी : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील मौज चांढवे गावाजवळ कार आणि आराम बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये आई-वडील व तीन लहान मुलांचा समावेश आहे. वडील दिगंबर दिघे, आई वृषाली दिगंबर दिघे (४५), मुलगी वैभवी दिघे (१०), वैष्णवी दिघे (१३), मुलगा वेदांत दिघे (८) सर्व रा. पिंपळदरी ता.महाड हे गंभीर जखमी आहेत. महाड एमआयडीसी पोलिसांनी जखमींना ग्रामीण रु ग्णालयमध्ये दाखल केले आहे.