पतीची हत्या करून भासवला अपघात
By admin | Published: May 17, 2017 01:17 AM2017-05-17T01:17:42+5:302017-05-17T01:17:42+5:30
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (२५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव करणाऱ्या स्वाती नितीन नायर (२५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन रमेश नायर (२७) असे मृताचे नाव असून, ते मूळचे केरळचे रहिवासी होते. रोजगाराच्या निमित्ताने ते बैतूल (मध्यप्रदेश) येथे स्थायिक झाले होते. स्वातीचे पहिले लग्न झाले अन् काडीमोडही झाला. त्यानंतर नितीनशी तिने दुसरे लग्न केले होते. नितीनने काही वर्षांपूर्वी भोपाळला टायरचे शोरूम सुरू केले अन् ते पत्नीसह तेथेच राहू लागले. औषधोपचारानिमित्त हे दाम्पत्य नागपुरात आले होते.
२९ एप्रिलला रात्री १०च्या सुमारास नितीनचा पायरीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा स्वातीने कांगावा केला आणि याची माहिती बजाजनगर पोलिसांना दिली. सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदनात नितीनची गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. तसेच नितीनचा भाऊ हरगोविंद रमेश नायर (२५) यानेही पोलिसांना स्वातीच्या अनैतिक संबंधांचा उलगडा करणारे काही पुरावे दिले. त्यानंतर पोलिसांनी स्वातीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
पोलीस पथक केरळकडे
नितीनच्या अंत्यसंस्कारानंतर स्वाती आईवडिलांसोबत लगेचच केरळला निघून गेली. त्यामुळे बजाजनगर पोलिसांचे पथक स्वातीला अटक करण्यासाठी केरळकडे निघाले आहे. या हत्येत अन्य कुणाच्या सहभागाबाबतही माहिती तिच्याकडून मिळू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.