सुपनेतील जवानाचा दिल्लीत अपघाती मृत्यू
By admin | Published: January 2, 2017 09:48 PM2017-01-02T21:48:39+5:302017-01-02T21:51:03+5:30
कऱ्हाड येथील जवानाचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.
आॅनलाइन लोकमत
सातारा, दि. 2 - पश्चिम सुपने, ता. कऱ्हाड येथील जवानाचा दिल्लीत अपघाती मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ही घटना घडली. विनोद अशोक गायकवाड असे त्या जवानाचे नाव आहे. दरम्यान, मृत जवानाचे पार्थिव मंगळवारी दुपारपर्यंत गावी आणले जाणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे सुपने गावावर शोककळा पसरली आहे.
पश्चिम सुपने येथील विनोद गायकवाड हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सेवेमध्ये होते. सध्या त्यांची दिल्ली येथे एनएसजीच्या विशेष कमांडो पथकात नेमणूक होती. रविवारी १ सकाळी विनोद गायकवाड यांचा दुचाकीवर अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विनोद यांचा धाकटा भाऊ विशाल याचा विवाह समारंभ होता.
या विवाहासाठी विनोद गावी आले होते. समारंभ आटोपल्यानंतर आठच दिवसांपूर्वी ते पुन्हा सेवेत रुजू झाले. दरम्यानच्या कालावधीत मोबाईलवरून त्यांचे कुटुंबीयांशीही बोलणे झाले होते. मात्र, रविवारी अचानक त्यांचा अपघात होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती दिल्ली येथून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारपर्यंत पार्थिव गावी पश्चिम सुपने येथे आणण्यात येणार असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.