कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 03:56 AM2017-10-13T03:56:38+5:302017-10-13T03:57:27+5:30
जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला.
उत्तूर/गारगोटी (जि. कोल्हापूर) : जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी बहिरेवाडी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
लडाखहून लष्करी गाडीतून कारगिल सीमेकडे दारूगोळा वाहून नेला जात होता. यावेळी टायर फुटल्याने गाडी उलटली. दारूगोळ्याचे बॉक्स येलकर यांच्या अंगावर पडले आणि त्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य सातजण जखमी झाले. येलकर हे २००७ मध्ये ते सैन्यात भरती झाले होते. त्यांचे वडील मुंबईत बेस्टमध्ये नोकरीस असल्याने हे कुटुंब नवी मुंबईत नेरुळ येथे वास्तव्यास आहे. प्रवीण यांचे शिक्षणदेखील मुंबईतच झाले आहे. त्यांच्या मृत्यूमुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार दोन दिवस बंद ठेवण्यात आला आहे.