‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप; सह्याद्रीच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास
By अझहर शेख | Published: March 20, 2023 02:09 PM2023-03-20T14:09:28+5:302023-03-20T14:09:49+5:30
पुण्याजवळील कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटातील नाणेघाट भागातील चोरदरीत गिर्यारोहणासाठी नाशिकमधून गेलेल्या बारा गिर्यारोहकांच्या ग्रूपमध्ये किरण काळे यांचाही समावेश होता.
नाशिक - शहरातून पुण्याजवळील माळशेज घाटमार्गातील चोरदरीतून ट्रेकिंग करणाऱ्या बारा ट्रेकर्सच्या ग्रूपमध्ये असलेले अनुभवी गिर्यारोहक किरण काळे (५२,रा.टाकळीरोड) यांचा अचानक तोल गेला. यामुळे ते दरीत कोसळून मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि.१९) दुपारच्या सुमारास घडली. याबाबतची बातमी नाशिक शहरात पसरताच गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला. गड, दुर्ग भ्रमंती करणाऱ्या विविध ग्रूपकडून सोशलमिडियावर सोमवारी (दि.२०) दिवसभर काळे यांना श्रद्धांजलीपर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त करण्यात येत होता.
पुण्याजवळील कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील माळशेज घाटातील नाणेघाट भागातील चोरदरीत गिर्यारोहणासाठी नाशिकमधून गेलेल्या बारा गिर्यारोहकांच्या ग्रूपमध्ये किरण काळे यांचाही समावेश होता. नाशिकचे प्रसिद्ध ट्रेकर म्हणून काळे यांची ओळख होती. चोरदरीतून चढाई करत घाटमाथ्यावर पोहचण्याच्या प्रयत्नात असताना रविवारी दुपारच्या सुमारास चोरदरीची अवघड व आव्हानात्मक वाटेत काळे यांचा तोल गेल्याने ते दरीत घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व तेथील जिल्हा प्रशासनासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी आपत्कालीन मदतीसाठी धाव घेतली. या घटनेमुळे दरीतील अरूंद वाटेत कोंडी होऊन अनेकजण अडकलेले होते. मदतकार्य करणाऱ्या पथकांनी त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यास यश आल्याचे मुरबाड तहसीलदार संदीप आवारी यांनी सांगितले. दुर्दैवाने काळे यांचा यामध्ये मृत्यू झाला. काळे हे मुळ धुळे येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या ग्रूपमधील अन्य गिर्यारोहक सुखरूप असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. धुळ्यातील स्मशानभूमीत सोमवारी सकाळी काळे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. -
सह्याद्रीच्या कुशीत ‘के.के’ यांची मालवली प्राणज्योत!
सह्याद्रीच्या पर्वतरांगेवर जीवापाड प्रेम करणारे किरण काळे उर्फ के.के यांनी गिरीभ्रमंतीचा छंद निष्ठेने जोपासला होता. अत्यंत अवघड व मध्यम श्रेणीचे सह्याद्रीच्या डोंगररांगेतील गड,किल्ले, सुळके त्यांनी यशस्वीरित्या सर केले होते. ट्रेकिंगची आवड असल्यामुळे काळे हे नेहमीच युवकांनाही ट्रेकिंगबद्दल मार्गदर्शन करायचे. या सह्याद्रीप्रेमी गिर्यारोहकाने रविवारी सह्याद्रीच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला. काळे हे एलआयसीचे विकास अधिकारी म्हणून नोकरीला होते.
‘ट्रेक’च्या अखेरच्या टप्प्यात काळाची झडप
गिर्यारोहण करत असताना चोरदरामधून अखेरच्या काही मीटर अंतराचा टप्पा शिल्लक राहिलेला होता. अवघड वाटेतून चढाईचा प्रयत्नात असताना काळे यांचा तोल गेला व काळाने त्यांच्यावर झडप घातली. नाणेघाटातील चोरदरा सर होत असतानाच ही दुर्दैवी घटना घडली. काळे हे नेहमीच सपत्नीक गिर्यारोहणाला प्राधान्यक्रम देत असे. पत्नीच्या साथीने त्यांनी मागील वर्षी जवळपास शंभरापेक्षा जास्त ट्रेक सह्याद्रीच्या कुशीत पुर्ण केले होते.या घटनेने काळे कुटुंबियांसह सर्वच गिर्यारोहकांना मोठा धक्का बसला आहे.