विनायक मेटे यांचे अपघाती निधन, बीड येथे आज होणार अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 05:44 AM2022-08-15T05:44:13+5:302022-08-15T05:44:51+5:30
Vinayak Mete : जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले.
वावोशी (रायगड)/नवी मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला.
जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली.
तासभर मदत नाही?
अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. १०० नंबरला फोन केला. मात्र, फोन उचलला नाही. मदतीसाठी मी विनवणी करत होतो, मात्र कुणीही थांबत नसल्याने मी रस्त्यावर झोपलो. असे मेटे यांचा गाडीचालक एकनाथ कदम याने सांगितले.
विनायक मेटे यांचे निधन झाले यावर माझा विश्वास बसत नाही. मराठी आरक्षणासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. सातत्याने त्यांची तळमळ मला जाणवली. मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हाच त्यांचा ध्यास होता. आरक्षणाबाबत अतिशय महत्त्वाची बैठक आम्ही ठेवली होती. मात्र, दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. अतिशय संघर्षातून आयुष्य जगत, गरिबीतून दिवस काढत विनायकराव मेटे यांनी आपले आयुष्य उभे केले होते.
-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
मराठवाड्यात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि कष्टाने स्वत:चे नेतृत्व उभे करणारे असे मेटेंचे व्यक्तिमत्त्व होते. मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न अशा सामाजिक प्रश्नांची त्यांना जाणीव होती.
- शरद पवार, अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस