साताऱ्याच्या Hirkani Riders Groupच्या Shubhangi Pawar यांचा अपघाती मृत्यू, मोहीम अर्धवट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:19 AM2021-10-13T11:19:02+5:302021-10-13T11:19:20+5:30
Hirkani Riders Group: साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार (३२) ( Shubhangi Pawar) यांचा अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येेथे मंगळवारी सकाळी टँकरच्या मागील चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला.
अर्धापूर (जि. नांदेड) : साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या सातारा येथील हिरकणी बाईक रायडर्सच्या ग्रुपमधील शुभांगी संभाजी पवार (३२) यांचा अर्धापूर तालुक्यातील भोकर फाटा येेथे मंगळवारी सकाळी टँकरच्या मागील चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. खराब रस्त्यामुळे त्यांची बाईक स्लीप होऊन टँकर डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कोल्हापूर येथील महालक्ष्मी व तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेऊन हा ग्रुप नांदेड येथून माहूर, वाशी, औरंगाबाद, नाशिक, वणी व पुन्हा सातारा, असा जाणार होता.
मंगळवारी सकाळी सचखंड गुरुद्वारा येथे दर्शन घेतल्यानंतर या सर्वजणी माहूरला जाण्यासाठी निघाल्या. हा ग्रुप भोकर फाटा येथे असताना शुभांगी पवार यांची बाईक खराब रस्त्यामुळे स्लीप होऊन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्यांच्या डोक्यावरून टँकरचे (जी.जे. १२ए.टी.-६९५७) चाक गेले. यात त्यांचा जागीच अंत झाला. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन होऊन मृतदेह साताराकडे रवाना करण्यात आला.
मोहिमेद्वारे होणार होता महिला सबलीकरणाचा प्रसार
- हिरकणी बाईक रायडर ग्रुपच्यावतीने साडेतीन शक्तिपीठ दर्शन ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरणाचा प्रचार आणि प्रसार केला जाणार होता.
- हा ग्रुप १० जिल्हे व १४ तालुक्यांतून जाणार होता. या मोहिमेत शुभांगी पवार, मनीषा फरांदे, अंजली शिंदे, मोना निकम जगताप, अर्चना कुकडे, ज्योती दुबे, केतकी चव्हाण, भाग्यश्री केळकर, श्रावणी बॅनर्जी, ऊर्मिला भोजने यांचा समावेश होता. ९ महिला सदस्या १० ऑक्टोबर रोजी १ हजार ६६८ किमी प्रवासासाठी बाईकने निघाल्या. त्यांना सातारा येथे खासदार उदयनराजे व अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी शुभेच्छा दिल्या होत्या.
सध्या नांदेड महामार्गाचे काम सुरू आहे. संबंधित गुत्तेदारांनी एका बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती न करता काम सुरू केले. या अपघाताला गुत्तेदाराची निष्काळजी कारणीभूत आहे. त्यामुळे गुत्तेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ओबीसी हक्क परिषदेचे प्रदेश महासचिव सखाराम क्षीरसागर यांनी केले आहे.