अपघाती मृत्यूंमध्ये ४३ टक्के घट; अपघातमुक्त महामार्ग योजनेचे यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:31 AM2020-01-31T01:31:11+5:302020-01-31T01:31:35+5:30
सन २०१६ मध्ये एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने अपघातमुक्त महामार्ग योजना (झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प) राबविण्यात आली.
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रवाशांसाठी २००२ मध्ये खुला करण्यात आला. हा देशातील पहिला एक्स्प्रेस वे आहे. येथे मोठ्या प्रमाणात अपघात घडत होते. त्यामुळे २०१६ मध्ये झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात आला. यामुळे गेल्या तीन वर्षांत अपघाती मृत्यूच्या प्रमाणात ४३ टक्क्यांनी घट झाली आहे. येथे २०१६ मध्ये १५१ जणांचा अपघाती मृत्यू झाला होता त्यामध्ये घट होऊन ही संख्या ८६ एवढी कमी झाली आहे.
सन २०१६ मध्ये एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाईफ फाऊंडेशन आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने अपघातमुक्त महामार्ग योजना (झिरो फटॅलिटी कॉरिडॉर प्रकल्प) राबविण्यात आली. त्याअंतर्गत अपघातांचा अभ्यास करून अभियांत्रिकी समस्या सोडविण्यात आल्या. पार्क केलेल्या वाहनांना धडक बसून होणारे अपघात रोखण्यासाठी स्मार्ट पेट्रोलिंग मोहीम राबविली. अपघात घडला तर जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरविण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या.
याबाबत बोलताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आर. एल. मोपलवार यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर होणारा प्रत्येक मृत्यू आमच्यासाठी गंभीर बाब आहे.
अपघाती मृत्यू शून्यावर येत नाही तोपर्यंत आमच्या उपाययोजना सुरूच राहातील. तर, वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विनय कारगावकर म्हणाले की, सातत्याच्या गस्त आणि वाहतूक नियम न पाळणाऱ्यांविरोधात कारवाई, यामुळे अपघातात होणºया मृत्यूंच्या संख्येत घट होत आहे. यापुढेही वाहतूक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे तसेच जबाबदारीने वाहन चालवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शून्य अपघाताचे ध्येय
सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक पीयूष तिवारी यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षेसाठी एकत्ररित्या उपक्रम राबविणे हा भारतात होणारे अपघात रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. अद्याप शून्य अपघाताचे ध्येय आम्हाला गाठता आलेले नाही पण एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस आणि आम्ही एकत्रितपणे ते ध्येय नक्की गाठू असा विश्वास आहे.