पुण्यात दररोज होतोय एकाचा अपघाती मृत्यू, अपघातांची मालिका, आठ महिन्यांत २४२ जणांचे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:33 AM2017-10-20T03:33:57+5:302017-10-20T03:34:33+5:30
पुणे शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे.
पुणे : शहरातील जीवघेण्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी केवळ आठ महिन्यातच २४२ जणांना प्राण गमवावे लागले असून, ४९२ जणांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला आहे.
जीवघेण्या रस्ते अपघाताचे सत्र शहरात सुरुच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात एका डंपरखाली येऊन युवतीला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतरही जवळपास दररोजच जीवघेण्या अपघातांची मालिका सुरु आहे. मंगळवारी (दि. १७) एकाच दिवशी शहरातील विविध भागांत तीन जणांना प्राण गमवावे लागले. कोंढव्यात उंड्री चौकात कंटेनरने धडक दिल्याने २० वर्षीय युवती, पीएमपीच्या धडकेत चंदननगरला २१ वर्षीय तरुण आाणि ट्रकच्या धडकेत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते आॅगस्ट २०१७ पर्यंत शहरात १ हजार ४७ अपघातांची नोंद झाली होती. शहरात दररोज जवळपास ५ अपघात होत आहेत. त्यात २४२ जणांना प्राण गमावावे लागले असून, ४९२ व्यक्ती गंभीर जखमी तर तर, ३१३ व्यक्ती किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी दिली. अपघातांची दरमहा सरासरी ही १३० इतकी आहे. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांत जवळपास दोनशे अपघातांची यात भर पडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीवघेण्या अपघातांची संख्या देखील अडीचशेवर पोहोचली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात सर्वाधिक जीवघेणे अपघात झाले असून, त्यात ४० जणांना प्राण गमवावे लागले. तर ९३ जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
देशभरातील अपघातांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त करीत, ही संख्या निम्म्यावर आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली होती. पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहरातील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक ९ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत.
सर्वाधिक ठिकाणे मुंबई - बंगळुरू महामार्गावर
वाहतूक शाखेने शहरातील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक ९ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत.