उघड्या डीपींमुळे अपघाताचा धोका
By Admin | Published: May 16, 2016 01:39 AM2016-05-16T01:39:06+5:302016-05-16T01:39:06+5:30
वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत.
लोणावळा : वीज वितरण कंपनीचे लोणावळा परिसरातील बहुतांश ठिकाणच्या डीपींचे दरवाजे तुटलेले आहेत. या उघड्या डीपींमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पिंपरी येथे मागील आठवड्यात एका रोहित्राला आग लागल्याने एकाचा जागीच जळून मृत्यू झाला
होता.
वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यालय असलेल्या नांगरगाव भागातील अनेक डीपींची झाकणे तुटलेली आहेत. यासह कुमार चौकातील पोलीस चौकीशेजारील डीपी, भांगरवाडी, रायवूड या सर्वच भागांमध्ये तीच परिस्थिती असताना कंपनी व अधिकारी याकडे डोळेझाक करत आहेत.
पंधरा दिवसांवर पावसाळा आला असून, या उघड्या डीपींमधून शॉर्ट सर्किटसारखे प्रकार होऊ शकतात. कंपनीने तातडीने याची दखल घेत डीपी बॉक्सला झाकणे लावावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
त्याचप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामात वीजतारांना अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम वीज वितरणच्या वतीने ठेकेदारांना देण्यात आले आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदार तळापासून झाडे तोडत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गालगतची अशाच प्रकारे वृक्षतोड सुरू असताना आयआरबीच्या वतीने हे काम थांबविण्यात आले आहे.
वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या कामांची पाहणी करत सदर ठेकेदारांना योग्य सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत
आहेत. (वार्ताहर)
> अनेक डीपी झाल्या जीर्ण
करंजगाव : नाणे मावळमधील जांभवली, थोरण, शिरदे, पाले नामा, उकसान, सोमवडी, भाजगाव, कोळवाडी, गोवित्री, उंबरवाडी, करंजगाव, साबळेवाडी, मोरमारवाडी, कांबरे, कोंडिवडे, नवीन उकसान, नानोली, साई, वाऊड, कचरेवाडी, घोणशेत येथील वीज वितरणच्या डीपी जीर्ण व खराब अवस्थेत आहेत. एखाद्या ठिकाणी विद्युतवाहक तार तुटली असता त्या जोडण्यासाठी विद्युतपुरवठा बंद करावा लागतो. परंतु, कार्यालयाला कळवूनही कर्मचारी पुरवठा बंद करण्यासाठी अनेकदा तीन-चार दिवसांनी हजर होतात. त्या दरम्यान तीन दिवस विद्युतपुरवठा खंडित झालेला असतो. विद्युत प्रवाहाच्या तुलनेत डीपीची क्षमता कमी असल्यामुळे काही ठिकाणी डीपीमधून ठिणग्या उडतात. काही डीपीमध्ये जाळ होतो. प्रशासन, महावितरणला सांगूनही डीपी दुरुस्त केल्या जात नाहीत.
खांबावर काही ठिकाणी शेतपंपाचे विद्युत जोड तोडले जातात. महावितरणला कळवले असता महावितरण सांगते की, आज कर्मचारी आलेला नाही. जो कर्मचारी त्या त्या गावासाठी नेमणूक झाली असेल, तर तोच कर्मचारी येऊ शकतो. अन्यथा, दुसरा कर्मचारी येत नाही. त्या दिवशी पंप बंद राहून शेतीचे नुकसान होते. रजेवरचा कर्मचारी आल्यावर मोटार लाइन जोडली जाते. तोपर्यंत शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे वाळलेले असते. महावितरणच्या अशा कारभाराने नागरिक त्रस्त झाले असून, विद्युत समस्या दूर करण्याची मागणी ते करीत आहेत.