सैराट चालकांमुळे वाढले अपघात
By admin | Published: January 17, 2017 03:49 AM2017-01-17T03:49:56+5:302017-01-17T03:49:56+5:30
नगरपरिषद हद्दीत तसेच गाव, खेडोपाडयातील रस्त्यांवर सध्या सुसाट बाईकस्वारांचा धुमाकूळ वाढला
शौकत शेख,
डहाणू- नगरपरिषद हद्दीत तसेच गाव, खेडोपाडयातील रस्त्यांवर सध्या सुसाट बाईकस्वारांचा धुमाकूळ वाढला आहे. बाईकस्वार तसेच चार चाकी वाहन चालक मोठया वेगाने वाहन चालवित असल्याने जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला यांना रस्त्यांवरून चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मात्र पोलीस व आरटीओ या बाबतीत गांभिर्याने लक्ष घालत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
डहाणू-चारोटी राज्यमार्ग रूंद झाल्याने तिथे सकाळी व रात्रीच्या वेळेस स्टंट करण्याचा प्रयत्न काही अति उत्साही चालक करतात. तर दिवसाही वेगाचे भान ठेवता काही चालक धूम स्टाईलने दुचाकी नेतात. रस्ते रुंद व मोठे असल्याने संध्याकाळच्या सुमारास गंजाड येथे मोठया प्रमाणात आदिवासी तरूण ताडी पिण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट घेऊन जात असतात. त्यामुळे सर्वात जास्त अपघात या महामार्गावर होत असतात. गेल्या शनिवारी दुपारच्या सुमारास वधना येथे अपघात होऊन नबी मलिक हा जागीच ठार झाला. तर गंजाड ढाकपाडा येथे टमटम व स्वीफ्टची समोरासमोर टक्कर होऊन टमटमचा चालक नायक हा गंभीर जखमी झाला. शिवाय डहाणूच्या इराणी रोडवर एका चारचाकी वाहनाने मोटरसायकलला ठोकर मारल्याने तीन जण गंभर जखमी झाले. वरोर-चिंचणी मार्गावर वृध्द आदिवासी महिला रस्ता ओलांडत असतांना तिला कारने जोरदार धडक दिल्याने तिच्या डोक्याला, पायाला, गंभीर दुखापत झाली. चिंचणी-तारापूर महामार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थी धूम स्टाईलने मोटार सायकल चालवित असल्याची तक्रार पोलीसात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
>कडक कारवाई व्हावी
विना लयसन्स, कागदपत्रे न बाळगात वाहन चालविणे, मोटार सायकलवर ट्रिपलसीट नेणे, पार्कींग झोन नसतांना रस्त्यांमध्ये गाडी उभी करणे, मद्यप्राशन करून गाडी चालविणे, अवैध प्रवासी वाहतूक, असे गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारी मोहीम राबवावी अशी मागणी आहे.