पुण्यातील पर्यटकांच्या कारला मालवणमध्ये अपघात, 2 जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 09:27 PM2017-10-21T21:27:33+5:302017-10-21T21:27:39+5:30
दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली.
मालवण : दिवाळीच्या सुटीत पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या कारला आनंदव्हाळ आजगाव बंगला बस थांब्याजवळ अपघात झाला. ही कार रस्त्याच्या डाव्या बाजूला दगडी गडग्यावर जोरदार आदळल्याने कारमधील दोघांना गंभीर दुखापत झाली. यावेळी रात्रीची गस्त घालणा-या मालवण पोलिसांनी जखमींना तत्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री घडला.
पुणे येथून मालवणला पर्यटनासाठी सिमेज गोपाळप्रसाद पटेल (२७), नेहा सिमेज पटेल (२६, दोन्ही रा. पुणे) व नीरज अनिल कुहावहा (२४, रा. इंदोर-मध्यप्रदेश) हे तिघेजण आपल्या ताब्यातील कार (एमपी ०९, सीव्ही ५२२६) घेऊन शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता निघाले. शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास आनंदव्हाळ येथे कार आली असता रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या दगडी गडग्यावर भरधाव वेगात आदळली. या धडकेत कारने पलटी मारत रस्त्याच्या विरुद्ध दिशेने ती उभी राहिली. यावेळी कारचे दोन्ही एअर बलून उघडले होते.
रात्रीची वेळ असल्याने अपघात घडल्यानंतर एकही वाहन रस्त्याने आले नाही. त्यानंतर काही वेळातच त्या मार्गावरून मालवण पोलीस रात्रीची गस्त घालीत होते. त्यावेळी त्यांना कारला अपघात झाल्याचे निदर्शनास आले. कारमधील तिन्ही पर्यटक कारमध्ये अडकून पडले होते. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनावणे, रमेश तावडे व पावसकर यांनी जखमींना कारच्या बाहेर काढत पोलिसांच्याच गाडीने तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्या मार्गावरून जाणाºया वाहन चालकांनी पोलिसांना सहकार्य केले.
मालवण पोलिसांनी घटनास्थळावरून १०८ रुग्णवाहिका तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क न झाल्याने पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यात सिमेज पटेल व नेहा पटेल यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. तर नीरज हा किरकोळ जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी पोलिस सुनील वेंगुर्लेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.