आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना सन्मानपत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 06:32 AM2019-06-26T06:32:49+5:302019-06-26T06:38:11+5:30
आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.
मुंबई : आणिबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांपैकी जे मानधन घेतात आणि घेत नाहीत अशा सर्वांना सन्मानपत्र दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. या बंदीजनांचे मानधन वाढविण्याचा भविष्यात निश्चितच विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
१९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्यांना प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरावा, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अजित पवार यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी सदस्य पराग अळवणी, सुभाष (पंडित) पाटील, शशिकांत शिंदे यांनीही चर्चेत सहभाग घेतला. माझे वडील, काका त्यावेळी तुरुंगात होते, आज ते नाहीत पण माझी वयोवृद्ध आई आहे. ती मानधन घेत नाही पण सरकारने तिला वा तिच्यासारख्यांना सन्मानपत्र तरी द्यायला हवे, असे शेकापचे सुभाष पाटील म्हणाले. त्यावर सन्मानपत्र देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा कमी कालावधीत तुरुंगवास भोगलेल्यांना ५ हजार, तर महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदीजनांना १० हजार मानधन देण्यात येते. बंदीजनाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास अनुक्रमे अडीच हजार व पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. आतापर्यंत ३२६७ जणांना मानधन मंजूर करण्यात आले आहे.
हे मानधन मिळण्यात अडचणी येणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबत विशेष लक्ष देण्यास सांगितले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.