लोकांच्या मते भ्रष्टाचार झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 06:18 AM2019-08-30T06:18:15+5:302019-08-30T06:19:16+5:30
प्रजा फाउंडेशनच्या अहवालातील दावा : मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल
मुंबई : राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असतानाच प्रजा फाउंडेशनने मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचा अहवाल गुरुवारी सादर केला. मतदारसंघनिहाय सर्वेक्षणानुसार आमदारांचा भ्रष्टाचार पाच वर्षांत ३८ टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत घरसल्याची मतदारांची भावना आहे. तर, विधिमंडळातील साधारण उपस्थिती वाढली असली तरी प्रश्न उपस्थित करण्याचे प्रमाण मात्र ४२ टक्क्यांनी घसरल्याचे ‘प्रजा’च्या अहवालात नमूद केले आहे.
प्रेस क्लब येथील पत्रकार परिषदेत प्रजा फाउंडेशनने मुंबईतील ३६ आमदारांच्या कामगिरीचा वार्षिक आणि पंचवार्षिक अहवाल सादर केला. आमदारांची विधिमंडळातील कामगिरी, दाखल गुन्हे, मतदारसंघातील उपलब्धता अशा विविध निकषांवर आमदारांची कामगिरी जोखण्यात आली आहे. प्र्रजा फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता आणि संचालक मिलिंद म्हस्के यांनी हा अहवाल सादर केला. या वर्षीच्या कामगिरीनुसार शिवसेनेचे वरळी येथील आमदार सुनील शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मुंबादेवीतील काँग्रेस आमदार अमिन पटेल दुसऱ्या तर मालाड येथील काँग्रेस आमदार अस्लम शेख तिसºया क्रमांकावर आहेत. तर, पंचवार्षिक अहवालात अमिन पटेल यांनी पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे सुनील प्रभू दुसºया तर अस्लम शेख तिसºया क्रमांकावर आहेत. पक्षीय पातळीवरील काँग्रेसच्या आमदारांनी एकत्रितपणे ७५ टक्के, भाजप आमदारांनी ६५ टक्के तर शिवसेना आमदारांनी ६० टक्के गुणांची कमाई केल्याचे प्र्रजा फाउंडेशनने स्पष्ट केले.
मागील सरकार व विद्यमान सरकारच्या काळातील आमदारांच्या कामगिरीची अहवालात तुलना केली आहे. २०१४ मध्ये ५९ टक्के तर आता ६४ टक्क्यांवर आली आहे. नागरिकांचे एकूण जीवनमान आठ टक्क्यांनी सुधारले आहे. २०१४ या निवडणूक वर्षातील आमदारांची मतदारसंघातील लोकांसाठीची उपलब्धता ३३ टक्के होती. या वर्षी मात्र ही टक्केवारी थेट ६० वर गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आमदारांची विधिमंडळातील कामगिरी मात्र ढासळली आहे. २००९ ते २०१४ या १२ व्या विधानसभेच्या कार्यकाळात मुंबईतील आमदारांनी ३८,६१८ प्रश्न उपस्थित केले होते. याउलट २०१४ ते २०१९ या १३ व्या विधानसभेत फक्त २२,३४५ प्रश्न उपस्थित करण्यात आले. विधिमंडळाच्या कामकाजातील ही घट ४२ टक्के इतकी आहे.
आमदार निधी खर्च करण्याच्या बाबतीत मुंबईतील सर्वच आमदार आघाडीवर आहेत. चांदिवलीचे काँग्रेस आमदार नसिम खान यांनी सर्वाधिक ९ कोटी ४७ लाखांचा निधी खर्च केला आहे. तर, माहिमचे शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी सर्वांत कमी म्हणजे ५ कोटी ८६ लाखांचा निधी विकासकामांवर खर्च केला.