खरेदी जागेनुसार की दर्जानुसार?

By admin | Published: April 12, 2016 03:27 AM2016-04-12T03:27:57+5:302016-04-12T03:27:57+5:30

‘आपल्याकडे आलेली जास्तीची औषधे दुसऱ्या रुग्णालयांना द्या; अथवा, जास्त जागा व्यापणाऱ्या औषधांचे आदेश रद्द करा,’ असा अजब आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य

According to the record of the place of purchase? | खरेदी जागेनुसार की दर्जानुसार?

खरेदी जागेनुसार की दर्जानुसार?

Next

- अतुल कुलकर्णी, मुंबई
‘आपल्याकडे आलेली जास्तीची औषधे दुसऱ्या रुग्णालयांना द्या; अथवा, जास्त जागा व्यापणाऱ्या औषधांचे आदेश रद्द करा,’ असा अजब आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी काढला आहे. त्यामुळे औषधांच्या दर्जानुसार त्यांची खरेदी होते की आकारमानानुसार, असा सवालही पुढे आला आहे.
औषधांची वारेमाप खरेदी तर झाली, पण या औषधांचे पुढे करायचे काय? अशी विचारणा होऊ लागल्यानंतर आयुक्तांनी आरोग्य सेवा संचालकांना ५ आॅगस्ट २०१५ रोजी एक पत्र पाठवले. त्यात, २६ औषधांचा विविध शहरांना करण्यात आलेला पुरवठा हा त्यांच्या एकूण मागणीपेक्षा जास्त आहे, त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आपण त्याचे ‘रीडिस्ट्रिब्युशन’ करावे, असा सल्ला दिला. तो देताना आयुक्त पुढे म्हणतात, जर हे शक्य नसेल तर साठागृहातील जास्त जागा व्यापणारी (स्पेस आक्यूपार्इंग) द्रव स्वरूपातील औषधे, सामग्रींचे आदेश पुरवठादाराला सांगून रद्द करा किंवा टप्प्याटप्प्याने पुरविण्याची व्यवस्था करा. अशा ९ औषधांची यादीच त्यांनी दिली आहे.
औषधे जागेच्या गरजेनुसार घ्यायची की, रुग्णांच्या गरजेनुसार हा मूलभूत प्रश्न यातून निर्माण झाला असून, अशी जास्तीची औषधे घ्या असे या विभागाला कोणी सांगितले होते? घेतल्यानंतर औषधे ठेवण्यासाठी गोदाम भाड्याने घ्या, असा सल्ला कोणाच्या डोक्यातून आला? गोदामाचे भाडे निविदा मागवून ठरवायचे असते की, तडजोड करून ठरवायचे असते? गोदामात औषधांचे तापमान व्यवस्थित राखण्याची कोणती व्यवस्था आहे? असे अनेक प्रश्नही या सगळ्यातून निर्माण झाले आहेत.

स्वस्त औषधांचा दुराग्रह
आम्ही स्वस्त औषधे घेतो, आणि राज्याचा वैद्यकीय शिक्षण विभाग मात्र महागडी औषधे घेतो, असे सांगून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याच्या नादात अनेक कचरा औषधांची खरेदीही या विभागाने केली आहे. परिणामी, दर्जा नसलेली औषधे घेतली गेली आहेत. दुसरीकडे ज्या औषधांची गरज आहे, त्यांची मात्र खरेदी केली गेली नाही, ‘आम्हाला गरज असणारी एवढी औषधे हवी आहेत,’ असे पत्र काही अधिकाऱ्यांनी आरोग्य संचालकांना दिले आहे, तेही आमच्याकडे उपल्बध आहे.

Web Title: According to the record of the place of purchase?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.