खाते उघडलेच नाही!

By Admin | Published: October 20, 2014 12:37 AM2014-10-20T00:37:55+5:302014-10-20T00:37:55+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातून १३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. मात्र त्यापैकी एकही महिला विधानसभेत पोहोचू शकली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या

Account not opened! | खाते उघडलेच नाही!

खाते उघडलेच नाही!

googlenewsNext

महिला उमेदवार : दुसऱ्या क्रमांकापर्यंत मारली मजल
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातून १३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. मात्र त्यापैकी एकही महिला विधानसभेत पोहोचू शकली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकापर्यंतची मजल महिलांनी मारली. त्यात राष्ट्रीय पक्षाच्या महिला उमेदवारांचा समावेश आहे.
नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी उमरेड, सावनेर आणि पूर्व नागपूर हे तीन मतदारसंघ वगळता इतर नऊ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. पश्चिम नागपुरातून काँग्रेसच्या उमेदवार प्रगती पाटील यांनी ४०३१ मते घेतली. गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आनंदी सयाम यांनी २८२ तर अपक्ष उमेदवार अनिता टेकाम यांनी ३०९ मते घेतली. या मतदारसंघात प्रगती पाटील या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. इतर दोन उमेदवार मात्र बऱ्याच मागे राहिल्या. हिंगणा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या कुंदा राऊत यांनी २० हजार ५७३ मते घेत चुरस निर्माण केली. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या अनिता टेकाम यांनी २९५ मते घेतली. कामठी मतदारसंघातून नंदा गजभिये या आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया तर हेमलता पाटील या बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी गजभिये यांनी ८०२ तर पाटील यांनी अवघी ३८० मते घेतली.
काटोल, रामटेक, दक्षिण नागपूर, दक्षिण पश्चिम, मध्य आणि उत्तर नागपूर मतदारसंघातून प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होती. दक्षिण नागपुरातून बसपाच्या सत्यभामा लोखंडे यांनी २३ हजार १५६ मते घेत तिसऱ्या क्रमांकावरपर्यंत पोहोचल्या. यासोबतच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतलेल्यांपैकी मध्य नागपुरातून आभा पांडे यांनी ४४४९, काटोलमधून गायत्री घरत यांनी १७४०, रामटेकमधून राणी राजश्रीदेवी बुलंदशाह यांनी ३९१, दक्षिण - पश्चिममधून भारती मेश्राम यांनी २६७ आणि उत्तर नागपुरातून नीना वासनिक यांनी १८० मते घेतली. (प्रतिनिधी)
५०० च्या घरात!
विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्यांपैकी दोन उमेदवारांनी पाच अंकी (१० हजारावर), तीन उमेदवारांनी चार अंकी (पाच हजाराच्या आत) मते घेतली. सात महिला उमेदवार ५०० मतेही घेऊ शकल्या नाही. यामध्ये पश्चिममधून आनंदी सयाम (२८२), अनिता टेकाम (३०९), कामठीतून हेमलता पाटील (३८०), हिंगण्यातून अनिता टेकाम (२९५), रामटेकमधून राजश्रीदेवी बुलंदशाह (३९१), दक्षिण - पश्चिममधून भारती मेश्राम (२६७), उत्तर नागपुरातून नीना वासनिक (१८०) यांचा समावेश आहे. हजारावर मते घेणाऱ्यांमध्ये गायत्री घरत (१७४०), प्रगती पाटील (४०३१), आभा पांडे (४४४९) यांचा तर १० हजारांवर मते घेणाऱ्या महिला उमेदवारांमध्ये कुंदा राऊत (२०५७३), सत्यभामा लोखंडे (२३१५६) यांचा समावेश आहे.

Web Title: Account not opened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.