केवायसीनंतर पीकविम्याचे पैसे खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:11 AM2017-08-02T01:11:54+5:302017-08-02T01:11:56+5:30
पीकविमा आता बँकांमध्ये आॅफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसून, पुढील दोन ते तीन महिन्यांत केवायसी करण्यात येईल.
मुंबई : पीकविमा आता बँकांमध्ये आॅफलाइन पद्धतीने भरण्यात येणार आहे. यापुढे पीकविम्यासाठी मुदतवाढ देणे शक्य नसून, पुढील
दोन ते तीन महिन्यांत केवायसी करण्यात येईल. त्यामुळे शेतक-याला स्वत:च्या खात्यात पैसे भरता येतील,
अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
पीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘पीक येणार की नाही, हे कळल्यानंतर विमा काढता येत नाही. त्यामुळे पुन्हा पीकविम्यासाठी मुदतवाढ देता येणार नाही. पाच ते सहा जिल्ह्यांत ही समस्या आहे. तेथे वाढीव मनुष्यबळ देऊन कामे पूर्ण करता येतील. आॅफलाइन पद्धतीने पीकविमा काढण्यात यावा, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. गेल्या वेळी ६० कोटींचे बोगस दावे आढळले असून, भविष्यात अशा समस्या येऊ नयेत, म्हणून शेतक-यांचे केवायसी बंधनकारक करण्यात येणार आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.