दंगल हा भाजपाचा निवडणूक ट्रेलर, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 04:47 AM2018-01-20T04:47:36+5:302018-01-20T04:47:41+5:30
जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे.
श्रीगोंदा (अहमदनगर) : जीएसटी व नोटाबंदीमुळे विकासाचा दर मंदावला आहे. नरेंद्र व देवेंद्र सरकार विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरले आहे. निवडणुकीची चाहूल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोरेगाव भीमाची जातीय दंगल हा भाजपाने केलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी श्रीगोंदा फॅक्टरी येथे बोलताना केला.
राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त शेतकरी मेळावा झाला. कृषी प्रदर्शन व नागवडे साखर कारखाना प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. चव्हाण म्हणाले, पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतक ºयांचे कंबरडे मोडले आहे. कर्जमाफी करण्यासाठी राज्य सरकारने जाचक अटी घालून शेतकºयांची कुचेष्टा केली आहे. पण उद्योगपतींना २ लाख १२ हजार कोटींची कर्जमाफी करण्यासाठी मोदी सरकारकडे पैसा कोठून येणार आहे. हा पैसा जनतेच्या खिशातून जाणार आहे. शिवाजीराव नागवडे यांनी काँग्रेसच्या विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन श्रीगोंद्यासारख्या दुष्काळी तालुक्याचे चित्र बदलण्यासाठी आयुष्य वेचले. त्यांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी राजकारणात राहून सहकारी संस्था चालविण्याची गरज आहे.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, नागवडेबापूंनी समाजाचे हित आणि कामातून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. ते अनेक संस्थांवर काम करीत आहेत. हे त्यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. शिवाजीराव नागवडे म्हणाले, राजकारणाला अडचणीच्या काळात सुरूवात केली. तत्त्व आणि निष्ठेचे राजकारण करीत असताना अनेक अडचणी आल्या, पण जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी भक्कम साथ दिली. त्यामुळे राजकारणातून समाजाचे हित साध्य करता आले, याचा आनंद आहे.