अजित पवार यांच्यासह ७६ जणांवर आरोप
By admin | Published: September 16, 2015 12:09 AM2015-09-16T00:09:36+5:302015-09-16T00:09:36+5:30
राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
नवी मुंबई : राज्य सहकारी बँकेमध्ये झालेल्या तब्बल १ हजार ८६ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ७६ जणांना दोषारोपपत्र पाठविण्यात आले असून, यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, दिलीप देशमुख, पांडुरंग फुंडकर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. २८ सप्टेंबरपासून या दोषारोपपत्रावर सुनावणी सुरू होणार आहे. संबंधितांचे आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे पाहून अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये २००८ ते २०१३ या पाच वर्षांमध्ये तत्कालीन संचालक मंडळाने साखर कारखाने व सूत गिरण्यांना नियमबाह्य कर्जवाटप करून बँक १ हजार ८६ कोटींच्या तोट्यात आणली. या अनियमिततेची दखल घेत रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची
नियुक्ती केली. तर या आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांची जून २०१४मध्ये नियुक्ती केली होती.
पहिनकर यांनी तब्बल १५ महिने सर्व व्यवहारांची चौकशी केली. साखर कारखाने व इतर अनेक सहकारी संस्थांना झालेले विनातारण कर्जवाटप आणि नियम डावलून घेण्यात आलेले निर्णय, चौकशीअंती समोर आले. यावर संचालक मंडळाच्या बैठकीत आमच्यापुढे जी विषयपत्रिका आली त्यावर आम्ही निर्णय घेतले, असे स्पष्टीकरण दिले गेले; परंतु ते ग्राह्य धरण्यात आले नाही. यामुळे पहिनकर यांनी तत्कालीन संचालक आणि अधिकाऱ्यांसह ७६ जणांवर १४१ पानांचे दोषारोप निश्चित केले आहेत. १० सप्टेंबरला हे दोषारोपपत्र सर्व संचालकांना पाठविण्यात आले आहे.
आरोपांविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी २८ सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. सर्व ७७ जणांना त्यांच्यावरील आरोपांविषयी स्पष्टीकरण व पुरावे देण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांनी दिलेल्या पुराव्यानंतर अंतिम जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. ज्यांच्यावर अंतिम जबाबदारी निश्चित होईल त्यांच्याकडून नुकसान झालेली रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात येईल. मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सुनावणीसाठी ६ महिने ते १ वर्षाचा कालावधी लागू शकतो. सद्य:स्थितीमध्ये तर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या अडचणी वाढल्या असून, ते आरोपांमधून बाहेर पडण्यासाठी काय पुरावे देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
यांच्यावर आहेत आरोप
राष्ट्रवादी : अजित पवार, विजयसिंह मोहिते : पाटील, दिलीप सोपाल, अमरसिंह पंडित, माणिकराव पाटील, ईश्वरलाल जैन, राजेंद्र जैन, यशवंतराव गडाख, हसन मुश्रीफ, राजवर्धन कदमबांडे, राजेंद्र शिंगणे, गुलाबराव शेळके
काँग्रेस : मदन पाटील,
दिलीपराव देशमुख, विजय वडेट्टिवार, माणिकराव
कोकाटे, रामप्रसाद बोर्डिकर,
रजनी पाटील, जयवंतराव आवाळे, मधुकर चव्हाण
शिवसेना : आनंदराव अडसूळ
भाजपा : पांडुरंग फुंडकर
शेकाप : जयंत पाटील,
मीनाक्षी पाटील