खुनातील फरार आरोपीला अटक

By admin | Published: December 26, 2015 01:05 AM2015-12-26T01:05:14+5:302015-12-26T01:05:14+5:30

दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग

The accused absconding accused arrested | खुनातील फरार आरोपीला अटक

खुनातील फरार आरोपीला अटक

Next

ठाणे : दिवा गावातील बाळाराम म्हात्रे (४५) यांच्या तब्बल २५ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातील औराव गावचा माजी सरपंच अनिल रामसागर चौबे याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट-१ने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली असून, त्याच्या आणखी एका साथीदाराला पकडण्यासाठी तीन पथके उत्तर प्रदेशमध्ये पाठविल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
१६ मार्च १९९० रोजी साबागाव, दिवा येथे बाळाराम हे घरात झोपलेले असतांना त्यांचा अंगरक्षक विजयसिंह आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केली होती. त्या वेळी संशयावरून तिघांना अटक केली होती. मात्र, मुख्य हल्लेखोर पोलिसांना मिळालेच नव्हते. ठोस पुराव्याअभावी अटकेतील तिघेही निर्दोष सुटले होते. तपास अपुराच राहिल्याने गुन्ह्याची उकल झाली नव्हती. यातील हल्लेखोरांबाबत एक महत्त्वाचा दुवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाच्या हाती लागला. विजयसिंह हाच अनिल चौबे असून त्याच्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये माजी सरपंच असल्याने त्याचे मोठे राजकीय वजनही असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच आधारे ठाकरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, हवालदार आनंदा भिलारे, सुनील जाधव, शिवाजी गायकवाड आणि सुभाष मोरे आदींनी चौबेला अटक केली.
सुभाष भोईरांचीही चौकशी
बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांच्या संशयावरून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यासह तिघांना अटक केली होती. पुन्हा भोईरांचीही चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

असे घडले सूडनाट्य...
मुंब्रा येथील शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांचे वडील रामचंद्र भगत उर्फ पिंट्यादादा आणि गोवर्धन म्हात्रे उर्फ गौऱ्यादादा या दोन मित्रांमध्ये जमिनीच्या वादातून १९८०मध्ये शत्रुत्व निर्माण झाले. त्यातूनच नौपाड्यातील आराधना सिनेमागृहात भरदिवसा पिंट्यादादाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने गौऱ्यावर वार करून त्याचा खून केला होता.
गौऱ्याचा भाऊ बाळाराम म्हात्रेने दाऊद टोळीतील शूटर महंमद काल्या आणि काही साथीदारांच्या मदतीने पिंट्यावर १९८३मध्ये गोळीबार करून त्याचा खून केला. बाळाराम आणि पिंट्याचे समर्थक यांच्यात एकमेकांचा काटा काढण्यासाठी त्यानंतर सुमारे सात वर्षे हल्ले-प्रतिहल्ले झाले. १९९०मध्ये बाळारामचाही खून झाला आणि सूडनाट्याला पूर्णविराम मिळाला. बाळारामच्या खुनाचा मात्र अद्याप छडा लागलेला नव्हता.

Web Title: The accused absconding accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.