उपचारांसाठी आणलेला आरोपी पसार
By admin | Published: August 6, 2016 05:20 AM2016-08-06T05:20:06+5:302016-08-06T05:20:06+5:30
अमलीपदार्थांच्या गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आरोपीने योजनाबद्ध पद्धतीने जे. जे. रुग्णालयातून पळ काढल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली.
मुंबई : अमलीपदार्थांच्या गुन्ह्यांत शिक्षा झालेल्या आरोपीने योजनाबद्ध पद्धतीने जे. जे. रुग्णालयातून पळ काढल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. मात्र पोलिसांनीही चपळाईने अवघ्या तीन तासांत आरोपीचा माग काढत त्याला अटक केली. मोहम्मद शेख असे आरोपीचे नाव आहे.
भायखळा परिसरात राहणाऱ्या शेखला २ आॅगस्ट रोजी नागपाडा पोलिसांनी अमलीपदार्थाच्या गुन्ह्यात अटक केली. या गुन्ह्यात त्याला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पोटात दुखत असल्याचे नाटक त्याने केले. त्यानंतर नायगावच्या सशस्त्र पोलीस दलातील दोन पोलिसांसोबत त्याला सकाळी साडे दहाच्या सुमारास जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले. त्याचदरम्यान केसपेपर काढण्यासाठी मोठी रांग असल्याने त्यांना बराच वेळ थांबावे लागले. याच गर्दीचा फायदा घेत साडे बाराच्या सुमारास शेखने तेथून पळ काढला. पोलिसांच्या हातावर फटका मारत तो बाहेर निसटला. कपडे बदलून तो तेथीलच एका फुटपाथवर लपून बसला होता.
बराच शोध घेऊनही शेखचा थांगपत्ता न लागल्याने तासाभराने याची माहिती जे. जे. मार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार, परिमंडळ १चे उपायुक्त मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उद्धवराव करंडे यांच्या नेतृत्वाखील तीन पथके बनविण्यात आली. या तपास पथकांपैकी पोलीस निरीक्षक उमेश कदम आणि पीएसआय प्रवीण फडतरे यांच्या पथकाला शेखला अटक करण्यात यश आले. अवघ्या तीन तासांत या पथकाने शेखला अटक केली. पोलिसांच्या रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखीन एक गुन्हा जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती जे.जे. मार्ग पोलिसांनी दिली.
>साहब नशा करके लौटनेवाला था ...
पोलिसांच्या रखवालीतून पसार झालेल्या मोहम्मद शेखने नशा करण्यासाठी पळ काढल्याची सबब पोलिसांना दिली. ‘तिथून पळ काढल्यानंतर मी मित्राचे घर गाठले. नशेमुळे घरातले ओरडतात. त्यामुळे मित्राकडून
५० रुपयांची उधारी घेत त्याचे शर्ट घालून बाहेर पडलो. नशा करून पुन्हा येणार होतो,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. ‘साहब नशा करके लौटने वाला था... इतनी भागदौड क्यू की?’ असे शेखनेच पोलिसांना विचारले.