औरंगाबादमधील आरोपी ठाण्यात चतुर्भुज
By Admin | Published: May 6, 2017 05:33 AM2017-05-06T05:33:41+5:302017-05-06T05:33:41+5:30
पाच महिन्यांपूर्वी औरंगाबाद पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या खुनाच्या आरोपीस ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या आरोपीच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पाच महिन्यांपूर्वी औरंगाबाद पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या खुनाच्या आरोपीस ठाणे पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या आरोपीच्या पलायन प्रकरणात औरंगाबादचा एक पोलीस शिपाई पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत, तर दुसरा फरार आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे बार चालवणाऱ्या संतोष महादेव मोरे (२९) याचे एका बारबालेशी प्रेमसंबंध होते. त्याने या बारबालेशी विवाहदेखील केला. पुढे संबंधांमध्ये कटुता निर्माण होऊन २०११ मध्ये त्याने पत्नीला घटस्फोट दिला. दरम्यान, त्याचा मित्र अनिल हवालसिंग शर्मा ( ३२) याचे या बारबालेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय संतोषला होता. यातूनच त्याने गोळ्या झाडून अनिल शर्माचा खून केला. १८ जानेवारी २०१६ रोजी औरंगाबाद ग्रामीणमधील गंगापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी संतोषसह १० आरोपींविरुद्ध संगनमताने खून केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. २० जानेवारी २०१६ रोजी गंगापूर पोलिसांनी सर्व १० आरोपींना अटक केली होती. पोलीस आणि न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने नऊ आरोपींना जामीन मंजूर केला. परंतु, संतोष मोरेची रवानगी औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाच्या न्यायालयीन कोठडीत केली. न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर २४ जानेवारी २०१७ रोजी त्याला पोलिसांनी वैजापूर न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयीन प्रक्रिया आटोपल्यानंतर पुन्हा औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहाकडे जाताना तो पोलिसांना हुलकावणी देऊन पळाला होता. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात दोन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस यंत्रणा त्याचा कसून शोध घेत होती. दरम्यान, तो मीरा रोड, दहिसर, मालाड आणि मुंबई परिसरात फिरत असल्याची माहिती वैजापूर पोलिसांना मिळाली. त्यांनी तत्काळ ठाणे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, गुन्हे अन्वेषण शाखेच्या घटक क्रमांक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सूत्रे हलवली. आरोपी ठाण्यातील माजिवडा भागात असल्याची माहिती त्यांना गोपनीय सूत्रांनी दिली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला सिनेवंडर मॉलमध्ये बेड्या ठोकल्या. एवढे दिवस मुंबईतील मालवणी परिसरात तो लपूनछपून राहत होता. फरार काळात टॅक्सीवर चालक म्हणून काम करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
चार महिन्यांपासून पोलीस शिपाई कोठडीत
२४ जानेवारी रोजी संतोष मोरेने पोलिसांना हुलकावणी दिल्यानंतर, कट रचून आरोपीस पळून जाण्यास मदत केल्याचा गुन्हा पोलीस शिपाई अशोक निकम आणि महिला पोलीस शिपाई बनकर यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अशोक निकम यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते आजही न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपीच्या अटकेने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
वैजापूर पोलिसांनी सोडला सुस्कारा
संतोष मोरे पळून गेल्यानंतर वैजापूर पोलिसांनी पोलीस शिपाई अशोक निकम यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यावेळी पोलिसांनी निकम याच्या पोलीस कोठडीची मागणीच केली नसल्याने त्यांची रवानगी सरळ न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. कालांतराने न्यायालयाने या बाबीची स्वत:हून दखल घेत, निकम यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली नाही, म्हणून वैजापूरचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध दांडेकर यांच्याविरुद्ध सुनावणी सुरू केली. शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार असतानाच ठाणे पोलिसांनी संतोष मोरेला अटक केल्याने वैजापूर पोलिसांना मोठा दिलासा दिला.