बोगस विमा रॅकेटमध्ये फिर्यादीच आरोपी
By Admin | Published: February 16, 2017 04:31 AM2017-02-16T04:31:21+5:302017-02-16T04:31:21+5:30
न झालेल्या अपघाताचा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराच कंपनीचा अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न
औरंगाबाद : न झालेल्या अपघाताचा दावा दाखल करून विमा कंपनीची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविणाराच कंपनीचा अधिकारी या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमधील डॉक्टर, दलाल आणि पोलीस हवालदार सध्या कोठडीत आहेत. या रॅकेटने १५ दिवसांत बोगस विम्याच्या दाव्यांतून तब्बल ६० लाख रुपये उचलल्याचे तपासात समोर आहे.
बोगस विम्याची कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटमधील डॉ. महेश मोहरीर, दलाल शेख लतीफ शेख अब्दुल, आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल अब्दुल रज्जाक अब्दुल रहीम हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. एचडीएफसी अर्गो, एसबीआय जनरल विमा कंपनी आणि फ्युचर जनरल विमा कंपनीकडे बोगस विमा दावे दाखल करून फसवणूक केल्याचे समोर आले होते.
याप्रकरणी एचडीएफसी अर्गोचा अधिकारी सतीश अवचार याच्या फिर्यादीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याच्या तपासात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. डी. नरवडे आणि छावणी ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मुश्ताक शेख यांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आले. या दोन्ही पोलिसांनीही बोगस अपघात पंचनामे केलेले होते, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. या रॅकेटने बनावट कागदपत्रांच्या आधारे पंधरा दिवसांत ६० लाखांहून अधिक विमा रक्कम उचलली. शेख लतीफ याने कोर्टातील काही कर्मचाऱ्यांनाही मॅनेज केले होते. विमा कंपनीच्या नावे कोर्टाने काढलेली नोटीस कोर्टातील कर्मचारी रजिस्टर्ड डाकने न पाठविता तो शेख लतीफकडे देत असे आणि लतीफ हाही नोटीस हातोहात अवचारकडे देत असे. अवचारही या रॅके टमध्ये सहभागी असल्याने तो आरोपींना मदत करी. (प्रतिनिधी)