स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला जालन्यात जिवंत जाळले, आर्थिक व्यवहारातून हत्या झाल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:48 AM2018-01-09T00:48:28+5:302018-01-09T00:48:59+5:30
शासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार अनंत श्रीकांत इंगोले (२८) यास हातपाय बांधून रविवारी मध्यरात्री जालन्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर जिवंत जाळण्यात आले. २१ लाखांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तो बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील रहिवासी होता.
शहागड (जि. जालना) : शासकीय सेवेसाठीच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा उमेदवार अनंत श्रीकांत इंगोले (२८) यास हातपाय बांधून रविवारी मध्यरात्री जालन्यातील शहागड-पाथरवाला रस्त्यावर जिवंत जाळण्यात आले. २१ लाखांच्या व्यवहारातून ही हत्या झाल्याचे त्याच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तो बीड जिल्ह्यातील सामनापूर येथील रहिवासी होता.
अनंत हा औरंगाबाद येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. रविवारी सायंकाळी धुमाळ (पूर्ण नाव कळालेले नाही) व अन्य दोघांसोबत कारने घरी येत असल्याचे त्याने नातेवाइकांसह ग्रामसेवक मित्र तुकाराम घोलप यांना सांगितले होते. त्यामुळे रात्री साडेनऊ वाजता घोलप यांनी त्याला फोन केला तेव्हा पाचोडजवळ ढाब्यावर जेवत असल्याचे त्याने सांगितले. रात्री बारा वाजता घोलप यांनी पुन्हा संपर्क साधल्यानंतर त्याने वाहनातील लोकांकडून माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्याशी संपर्क झाला नाही.
रात्री दीड वाजता साखर कारखान्याच्या सुरक्षारक्षकाला एका व्यक्तीला पेटविल्याचे दिसले. त्याने गोंदी पोलिसांना कळविले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन आग विझवली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अनंतची ओळख मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून पटली. अनंतचे पदुव्यत्तर शिक्षण झाले होते. तो वासनवाडी (जि. बीड) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आॅपरेटर होता. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने औरंगाबादला खासगी शिकवणी लावली होती.
घटनेपूर्वी भावाला एसएमएस
घटनेपूर्वी मोठा भाऊ गोविंद यास अनंतने एसएमएस करून धुमाळ व अन्य एक व्यक्तीकडून मला २१ लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यांचे वर्तन ठीक नसून माझ्या जिवाला धोका असल्याचे कळविले होते.