आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:05 AM2024-11-23T06:05:52+5:302024-11-23T06:06:30+5:30
आतापर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच कटातील आरोपींच्या बँक खात्यात वाघने पैसे ट्रान्सफर केले आहेत.
मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात अकोलामधून सुमित दिनकर वाघ (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याने फरार आरोपी शुभम लोणकरच्या सांगण्यावरून आरोपींच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केल्याचे पोलिस तपासात समोर आले असून, एकत्र शिक्षण घेतलेले हे दोघेही चांगले मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींचा गुन्हे शाखेकडून कसून शोध सुरू असून, आतापर्यंत २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. याच कटातील आरोपींच्या बँक खात्यात वाघने पैसे ट्रान्सफर केले आहेत. वाघ हा मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी असू, त्याला पोलिसांनी मुंबईत आणले आहे.
लोणकरच्या सांगण्यावरून व्यवहार
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, वाघने कर्नाटक बँकेचे खाते वापरून शूटर गुरुमेल सिंगचा भाऊ नरेशकुमार, अटक आरोपी रूपेश मोहोळ आणि हरीशकुमार यांना पैसे ट्रान्सफर केले. अटक आरोपी सलमान व्होरा याच्या नावाने खरेदी केलेल्या सिम कार्डवरून इंटरनेट बँकिंगद्वारे हा व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यासाठी व्होरा याच्या नावानेच बँक खाते उघडण्यात आले होते.
शुभम लोणकरच्या सांगण्यावरून हे सर्व व्यवहार त्याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. वाघ आणि शुभम दोघेही अकोटचे रहिवासी असून त्यांनी एकत्रच शिक्षण घेतल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.